भूमिगत केबल कामातील गोंधळामुळे नागरिक त्रस्त; आमदार सुरेश भोळे यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
जळगाव : जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत शहरात सुरू असलेल्या भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामातील नियोजनशून्यतेमुळे जळगावकरांना अघोषित लोडशेडिंग आणि अंधाराचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या अधिकाऱ्यांची तातडीची संयुक्त बैठक घेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
ठेकेदारांच्या मनमानीवर आमदारांचा संताप
शहरात विविध भागांमध्ये भूमिगत विद्युत केबल टाकण्याचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदारांकडून निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. नवीन केबलची जोडणी पूर्ण होण्यापूर्वीच जुन्या स्ट्रीट लाईटच्या केबल्स कापल्या जात असल्याने अनेक रस्ते आणि कॉलनी रात्रीच्या वेळी अंधारात बुडत आहेत.
विशेष म्हणजे, या कामाबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याने विविध यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे समोर आला आहे.
महावितरणच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह
शहरात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. महावितरणकडून प्रत्येक वेळी “तांत्रिक बिघाड” असल्याचे कारण देत वेळ मारून नेली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
स्ट्रीट लाईटचे फ्युज, वायरिंग आणि नियमित देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उकाड्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला आहे.
“जनतेला वेठीस धरू नका” – आमदार भोळे
पद्मालय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला.
“विविध विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे जळगावच्या जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदारांनी मनमानी पद्धतीने कामे केल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा. नागरिकांना अखंडित वीजपुरवठा आणि प्रकाशमान रस्ते मिळणे हा त्यांचा हक्क आहे. यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही,” असा सज्जड दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
नागरिकांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे
आमदार भोळे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कितपत सक्रिय होतात, तसेच शहरातील अंधार आणि वीज समस्येवर कितपत तोडगा निघतो, याकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले आहे.
