Spread the love

शिवाजी रोडच्या व्हाइट टॉपिंग काँक्रिटीकरणाचे आमदार अनुपभय्या अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन

धुळे : धुळे शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह विविध विकासकामांना गती देण्यात येत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहराला स्मार्ट आणि सुंदर बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, धुळेकरांनीही विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन आमदार अनुपभय्या अग्रवाल यांनी केले.

शहरातील पांझरा नदीकाठावरील शिवाजी महाराज रोडवरील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर ते श्री स्वामी समर्थ केंद्रापर्यंतच्या व्हाइट टॉपिंग रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी आमदार अनुपभय्या अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी महापौर मायादेवी परदेशी, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, भाजप गटनेत्या किरण कुलेवार, माजी महापौर तथा नगरसेविका कल्पना महाले, नगरसेवक सुनील बैसाणे, ललित आरुजा, रोहित चांदोडे, भिकन वराडे, महादेव परदेशी, प्रफुल्ल पाटील, धीरज जगताप, मयूर ठाकरे, सागर चौधरी, शहर अभियंता चंद्रकांत उगले, कनिष्ठ अभियंता प्रणव शिंदे, ठेकेदार मिलिंद मुडावदकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दर्जेदार रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी
आमदार अग्रवाल यांनी सांगितले की, श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर ते श्री स्वामी समर्थ केंद्र, महात्मा गांधी पुतळा तसेच झाशी राणी पुतळा ते अग्रवाल विश्राम भवनापर्यंतच्या व्हाइट टॉपिंग काँक्रिटीकरणासाठी तब्बल ५ कोटी ४८ लाख ८६ हजार ९६७ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

याशिवाय, श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर ते संतोषी माता चौकापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

तसेच साक्री रोडवरील संतोषी माता मंदिर चौक ते सुंदरमाधव हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पारोळा रोडवरील शेतकरी पुतळा ते दाता सरकार मंगल कार्यालयापर्यंतच्या रस्त्यासाठीही २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

वाहतूक कोंडीवरही होणार उपाय
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावरील भूमिगत गटारीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यात रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले.

शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सर्व कामे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. या विकासकामांमुळे मुख्य बाजारपेठेसह शहरातील विविध भागांतील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version