Spread the love

महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांची आक्रमक भूमिका; कठोर कारवाईची मागणी

फैजपूर  : “सलोखा आणि समरसतेची परंपरा लाभलेल्या फैजपूर शहरात उघडपणे सुरू असलेली गोमातेची कत्तल तात्काळ बंद करण्यात यावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी आक्रमक भूमिका महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी मांडली.

फैजपूर परिसरातील संत मंडळींसह उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) अनिल बडगुजर यांची भेट घेताना ते बोलत होते. शहरातील काही भागांत सुरू असलेल्या कथित अवैध कत्तलीमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असून, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली.

महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच, फैजपूर शहर हे शांतता आणि सामाजिक ऐक्यासाठी ओळखले जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपस्थित संत मंडळींनी देखील प्रशासनाकडे अवैध प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली. नागरिकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, डीवायएसपी अनिल बडगुजर यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version