Spread the love

ड्रेनेज सफाईअभावी दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव; दुकानदारांचा प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप

जळगाव : जळगाव शहरातील व. वा. म्युनिसिपल मार्केट अर्थात गोलाणी मार्केट परिसरात घाण पाण्याच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले असून, A विंगसह अनेक भागातील बेसमेंटमध्ये साचलेल्या सांडपाण्यामुळे व्यापारी आणि नागरिक हैराण झाले आहेत. ड्रेनेज आणि चेंबरची नियमित साफसफाई न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात तब्बल ३५ ते ४० वेळा महापालिकेकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दुकानदारांनी महापौर Deepmala Kale यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मार्केटच्या मागील बाजूस असलेले चेंबर आणि ड्रेनेज लाईनची अनेक वर्षांपासून योग्य प्रकारे साफसफाई करण्यात आलेली नाही. यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसून संडास आणि बाथरूममधील घाण पाणी थेट बेसमेंटमध्ये साचत आहे.

दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, ड्रेनेज पाइपचा व्यास कमी असल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. बेसमेंटमध्ये सतत साचून राहणाऱ्या घाण पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, बेसमेंटमध्ये घाण पाणी साचण्याची समस्या मागील तीन ते चार वर्षांपासून कायम असल्याचा गंभीर आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. या अस्वच्छतेमुळे ग्राहक मार्केट परिसर टाळत असल्याने व्यवसायावरही परिणाम होत आहे. काही दुकानदारांना तर बाथरूम बंद ठेवण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले आहे.

तक्रारदारांनी महापालिका प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत महापौर दीपमाला काळे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. “आरोग्याच्या दृष्टीने ही अत्यंत धोकादायक परिस्थिती असून भविष्यात कोणत्याही नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका जबाबदार राहील,” असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे जळगांव महापालिकेच्या स्वच्छता आणि नागरी सुविधांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

व्यापारी आणि नागरिकांकडून जोरदार मागणी
महापौर दीपमाला काळे यांनी यापूर्वी शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करत स्वतः टाकीत उतरून पाहणी केली होती. त्याच धर्तीवर त्यांनी गोलाणी मार्केट परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन बेसमेंटमध्ये साचलेल्या घाण पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version