Spread the love

रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांचा विळखा; वाहतूक कोंडीमुळे नागरिक, विद्यार्थी आणि रिक्षाचालक त्रस्त

कल्याण (संदीप शेंडगे) : कल्याणजवळील मोहने परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा वाढता विळखा आता नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून रिक्षाचालक संघटनाही याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. मोहने मुख्य बाजारपेठ ते स्टेशन परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात हातगाड्या, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, आईस्क्रीम विक्रेते, भेळपुरी, मोमोज आणि शोरमा विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत या परिसरातून मार्ग काढणे नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हातगाड्या उभ्या राहत असल्याने वाहनांसाठी जागाच उरत नाही. परिणामी सतत वाहतूक कोंडी होत असून रिक्षाचालक, नोकरदार, विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर रिक्षा चालक-मालक असोसिएशन, आंबिवली-मोहने विभागाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी थेट पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. “अनधिकृत फेरीवाल्यांमुळे रस्ते अरुंद झाले असून रिक्षा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही,” असा आरोप त्यांनी केला आहे.

स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी कायमस्वरूपी ठाण मांडल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरावा लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे.

रिक्षाचालक संघटनेच्या म्हणण्यानुसार, अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक असतानाही प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी मोहीम राबवली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, परिसरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी केली आहे. “फेरीवाल्यांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून आपत्कालीन सेवा वाहनांनाही मार्ग काढणे कठीण होत आहे,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. मोहने परिसरातील वाढत्या अतिक्रमणामुळे स्थानिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, पालिका प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेते आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version