स्थानिक प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणार; नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार
पुणे (शंकर जोग) : मिम-भिम सामाजिक संघटनेच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी परविन शाहिद शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हुसेन शेख यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या नियुक्ती सोहळ्यावेळी अमन सय्यद, साहिल सय्यद, तेजस कापसे, शाहिद शेख, किरण सूर्यवंशी, भूषण बनसोडे, साबिर शेख, आफान शेख, नाझीम जागीरदार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नियुक्तीनंतर बोलताना परविन शेख यांनी संघटनेच्या माध्यमातून पुणे शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या आणि प्रलंबित प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. “सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक असेल तेथे आंदोलन, मोर्चे आणि लोकशाही मार्गाने संघर्ष उभारण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले. तसेच महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक नागरी समस्यांवर संघटनेच्या माध्यमातून प्रभावी काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हुसेन शेख यांनी परविन शेख यांच्या नियुक्तीमुळे संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आणि जनसंपर्क लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या नियुक्तीमुळे मिम-भिम सामाजिक संघटनेच्या महिला आघाडीला अधिक बळ मिळणार असून शहरातील विविध सामाजिक प्रश्नांवर संघटना अधिक प्रभावीपणे काम करेल, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
