श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयाची इंधन बचत व स्वदेशी जनजागृती रॅली
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या अमेरिका–इस्रायल–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची शक्यता आणि वाढती महागाई लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत, स्वदेशीचा स्वीकार आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे. या राष्ट्रीय आवाहनाला प्रतिसाद देत माटुंगा येथील सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जनजागृती रॅलीचे आयोजन केले.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्रसेना (NCC) विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीमध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजात ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचवला.
“इंधन वाचवा”, “स्वदेशी स्वीकारा”, “सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा”, “ऊर्जा बचत हीच देशसेवा” तसेच “अनावश्यक परदेश प्रवास टाळा” अशा विविध संदेशांचे फलक आणि बॅनर्स हातात घेऊन विद्यार्थिनींनी महाविद्यालय परिसरातून महेश्वरी उद्यान, खालसा महाविद्यालय आणि डॉन बॉस्को शाळा परिसरापर्यंत जनजागृती फेरी काढली.
रॅलीदरम्यान विद्यार्थिनींनी नागरिकांना पेट्रोल-डिझेल बचतीचे महत्त्व, पर्यावरण रक्षणाची गरज आणि राष्ट्रीय जबाबदारी याविषयी जागरूक केले. घोषणाबाजी आणि शिस्तबद्ध सहभागामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनीही विद्यार्थिनींच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या अर्चना पत्की यांनी विद्यार्थिनींच्या सामाजिक जाणीवा आणि राष्ट्रीय बांधिलकीचे विशेष कौतुक केले. “शैक्षणिक प्रगतीसोबत विद्यार्थिनींमध्ये सामाजिक संवेदनशीलता, राष्ट्रीय कर्तव्यभावना आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव विकसित होणे काळाची गरज आहे,” असे त्या म्हणाल्या. सुट्टीचा कालावधी असतानाही विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी रेखा शेलार, सोनी सिंह, केजल धनधुकिया तसेच राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या लेफ्टनंट सुवर्णा जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहकार्य केले. जनजागृती रॅलीमध्ये एकूण ३० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सामाजिक प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तरुण पिढी पुढे येत असल्याचे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
