Spread the love

पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक उपक्रमांचे नियोजन; विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत जनजागृतीवर भर

पारोळा (संदीप पाटील) : पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या “सिडबॉल्स कॅम्पेन २०२६-२७” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची नियोजन बैठक सोमवारी (दि. १८ मे) एनईएस गर्ल्स हायस्कूल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, स्वयंसेवक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत आगामी तीन महिन्यांसाठी विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे सविस्तर नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर सिडबॉल्स निर्मिती, सिडबॉल्स कार्यशाळा, पशु-पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करणे, महिलांसाठी “माझी परसबाग” स्पर्धा, वृक्षारोपण मोहीम, पंचवटी निर्मिती तसेच पर्यावरण जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

या अभियानासाठी आवश्यक वृक्षरोपे कल्पना फाउंडेशन आणि डॉ. सचिन करोडपती यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच समितीच्या वतीने विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

बैठकीदरम्यान पर्यावरण संवर्धन ही केवळ मोहीम नसून ती सामाजिक जबाबदारी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. वाढते तापमान, घटते वृक्षप्रमाण आणि पर्यावरणीय असमतोल लक्षात घेता नागरिकांनी प्रत्यक्ष कृतीतून पुढाकार घेण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या अभियानात डॉ. सुदर्शन जैन, रवींद्र निकम, कल्पेश नावरकर, मांगेश पवार, धर्मेंद्र शिंपी, भरत जाधव, श्री. नेरपगार आणि श्री. चौधरी सर आदी मान्यवर सहकार्य करणार असल्याची माहिती देण्यात आली.

“सिडबॉल्स कॅम्पेन”चे हे सलग आठवे वर्ष असून हा उपक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांत या अभियानातून हजारो सिडबॉल्स तयार करून विविध भागात फेकण्यात आले असून त्यातून मोठ्या प्रमाणावर वृक्षसंवर्धनाला चालना मिळाल्याचे सांगण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version