Spread the love

खत्री गल्लीतील घराच्या मीटरला अचानक आग; नागरिकांचा संताप, वारंवार तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

धरणगाव : धरणगाव शहरातील विद्युत वितरण व्यवस्थेतील निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील खत्री गल्ली परिसरात एका घरातील वीज मीटरला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

खत्री गल्लीतील रहिवासी गणेश रावतोळे यांच्या घरातील वीज मीटरने दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केल्याने परिसरातील नागरिक घाबरून गेले. आगीमुळे घरातील सदस्यांमध्ये घबराट पसरली होती. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत मोठ्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. मात्र, आग विझवताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. खत्री गल्ली परिसरात विद्युत लोड सेटिंगचा प्रश्न गंभीर बनला असून, वारंवार विद्युत पुरवठ्यात बिघाड होत असल्याची तक्रार नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा केली होती. “लोड सेटिंगमुळे मीटरमध्ये स्पार्किंग आणि विजेच्या तारा गरम होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. याबाबत महावितरणकडे अनेकदा लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले,” असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दोन दिवसांपूर्वी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी परिसरात आले होते. मात्र त्यांनी प्रत्यक्ष समस्येचे निराकरण करण्याऐवजी केवळ औपचारिक पाहणी करून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “अधिकारी फक्त वेळ मारून नेत आहेत. समस्या कायम असून भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडू शकते,” अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “या प्रकाराला जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित विद्युत यंत्रणेची तपासणी करावी, परिसरातील लोड सेटिंगची समस्या सोडवावी तसेच निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version