Spread the love

माजी आमदार शाह फारूक अन्वर यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन

धुळे (सुनील निकम) : धुळे जिल्हा प्रशासन आणि धुळे महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण निष्कासन मोहिमेविरोधात माजी आमदार शाह फारूक अन्वर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवत गरीब नागरिकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरातील देवपूर सुशी नाला परिसरासह स्टेशन रोड आणि इतर भागांमध्ये प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, ही कारवाई शासनाच्या २५ मार्च २०२६ च्या धोरणाच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या ५० ते ७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण न करता आणि त्यांचे पुनर्वसन न करता कारवाई केली जात असल्याने शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत.

“ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गरीब नागरिकांना नोटिसा देऊन घरे हटविण्याची मोहीम राबवली जात आहे. यामुळे दलित, मुस्लिम, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील नागरिक उघड्यावर आले असून त्यांच्यासमोर निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

माजी आमदार शाह फारूक अन्वर यांनी प्रशासनावर शासन निर्णयाची पायमल्ली केल्याचा आरोप करत, पुनर्वसनाशिवाय कोणतीही अतिक्रमण कारवाई करू नये, अशी मागणी केली आहे. शासनाच्या मालकीच्या लगतच्या जागांवर किंवा त्याच ठिकाणी बाधित नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

या मोहिमेमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याचे सांगत, धुळे जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेला तात्काळ कारवाई थांबविण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, अतिक्रमण कारवाईमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांमध्ये मोठी नाराजी असून, पुनर्वसनाशिवाय कारवाई होऊ नये, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडूनही केली जात आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्षामुळे हा प्रश्न अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version