दोषींवर कठोर कारवाईची मागणी; बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन करून प्रशासनाला दिले निवेदन
पुणे (शंकर जोग) : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर झाड कत्तलीच्या विरोधात रिपब्लिकन आझाद सेना आक्रमक झाली असून, दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संघटनेच्या वतीने बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर संघटना रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाचेही लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे.
मार्केटयार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात काही झाडांच्या फांद्या कापण्यासह झाडांची कत्तल करण्यात येत असल्याचा आरोप रिपब्लिकन आझाद सेनेने केला आहे. गजबजलेल्या शहरी भागात पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या झाडांची अशा प्रकारे तोड होत असल्याने नागरिकांमध्येही संतापाची भावना व्यक्त होत आहे.
आंदोलनादरम्यान रिपब्लिकन आझाद सेनेच्या शिष्टमंडळाने बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती शीतल वाकडे यांची भेट घेत संबंधित मागण्यांचे निवेदन सादर केले. झाडांची बेकायदेशीर तोड करणाऱ्यांची चौकशी करून संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील वाढते प्रदूषण, उष्णतेची तीव्रता आणि कमी होत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता झाडांचे संरक्षण ही काळाची गरज बनली आहे. मात्र काही घटकांकडून आर्थिक फायद्यासाठी झाडांची कत्तल केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हे आंदोलन रिपब्लिकन आझाद सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आंदोलनात पुणे शहराध्यक्ष दत्ता कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा शीला उपाध्ये, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रवींद्र कुचेकर आणि पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संजय खंडागळे यांनी प्रमुख सहभाग नोंदवला.
याशिवाय हिरा कांबळे, संदीप चव्हाण, महादेव कांबळे, आकाश शिंदे, सचिन कदम, राहुल शेळके, नागेश शिंदे, भावेश कांबळे, रुपेश चव्हाण, आदित्य कांबळे, निलेश शिंदे, ऋषिकेश कांबळे, गणेश शिंदे, श्रेयश कांबळे, समर्थ शिंदे, रुद्र कांबळे, रोहित कांबळे, अर्जुन धनवाल, सक्षम कुचेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या आंदोलनामुळे मार्केटयार्ड परिसरातील झाड कत्तलीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
