Spread the love

उमेदवारीवरून भाजप-शिंदे गटात अंतर्गत संघर्ष तीव्र, जिल्ह्याच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता

जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीतच रस्सीखेच

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. उमेदवारीच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचीदरम्यान आता एक नवी राजकीय चर्चा रंगू लागली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांना थेट भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची ऑफर मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच महायुतीमधील जागावाटपाचा तिढा समोर आला आहे. जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा करण्यात येत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे.

शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या जागेवर आपला ठाम दावा करत पुत्र प्रताप पाटील यांचे नाव पुढे केले आहे. प्रताप पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असून गेल्या काही वर्षांपासून ते स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. पालकमंत्र्यांच्या राजकीय प्रभावामुळे त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असतानाच भाजपनेही ही जागा सोडण्यास नकार दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबूत संघटन उभारले आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये भाजपचे मोठे संख्याबळ असल्याने ही जागा भाजपच्या वाट्याला यावी, अशी भूमिका पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून मांडली जात आहे. भाजपकडून अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली असून पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंगलाही वेग आल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे, गुलाबराव पाटील यांचा जिल्ह्यातील प्रभाव, संघटन क्षमता आणि महायुतीसाठी केलेले राजकीय योगदान लक्षात घेता ही जागा शिंदे गटालाच मिळावी, असा आग्रह कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीमध्येच अंतर्गत स्पर्धेचे चित्र निर्माण झाले आहे.

या निवडणुकीतील गणितही अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप झालेल्या नसल्याने ६८ जिल्हा परिषद सदस्य आणि १५ पंचायत समिती सभापती मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत. त्यामुळे आता संपूर्ण निवडणूक जळगाव महापालिका, जिल्ह्यातील १५ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींतील निर्वाचित तसेच स्वीकृत सदस्यांभोवती केंद्रित झाली आहे. सुमारे ६३० नगरसेवकांच्या मतदानावर विधान परिषद सदस्याची निवड होणार असल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे.

याच पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून नगरसेवकांशी संपर्क, गाठीभेटी आणि रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही निवडणूक केवळ विधान परिषद सदस्य निवडण्यापुरती मर्यादित राहणार नाही, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार आहे. जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत आहे की शिंदे गटाने स्वतंत्र राजकीय ताकद निर्माण केली आहे, याची चाचणी या निवडणुकीतून होणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम राहिल्यास प्रताप पाटील यांना भाजपच्या चिन्हावर मैदानात उतरविण्याचा पर्यायही चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखीच ढवळून निघाले आहे. भाजपची ऑफर स्वीकारली जाणार का, महायुतीत तडजोड होणार का, की मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार केवळ गुलाबराव पाटील यांच्याकडे नसून शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबईतील बैठका, पक्षश्रेष्ठींच्या चर्चा आणि आगामी एक-दोन दिवसांत होणाऱ्या निर्णयांकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

प्रत्यक्ष भूमिका जाणून घेण्यासाठी प्रताप पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यामुळे राजकीय चर्चांना आणखी खतपाणी मिळाले असून जळगाव विधान परिषद निवडणूक आता अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version