साक्री तालुक्यातील काशीपूर येथील घटना; “एक रुपया किलो भावात शेती कशी परवडणार?” शेतकऱ्यांचा सवाल
धुळे (सुनील निकम) : बाजारात गवार पिकाला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून येऊ लागला आहे. साक्री तालुक्यातील काशीपूर येथील एका शेतकऱ्याने तर संतापाच्या भरात तब्बल दीड क्विंटल गवार थेट रस्त्यावर फेकून शासन आणि बाजार व्यवस्थेविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. पेरेजपुर फाटा परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ रस्ता अक्षरशः हिरवागार दिसत होता. या घटनेने परिसरात मोठी चर्चा रंगली असून शेतकऱ्यांच्या व्यथा पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
काशीपूर येथील शेतकरी साहेबराव कारंडे यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात गवार पिकाची लागवड केली होती. पिकासाठी बियाणे, खते, औषधे, सिंचन आणि मजुरी यावर हजारो रुपयांचा खर्च करण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून मेहनत घेत पीक जोपासल्यानंतर बाजारात योग्य दर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात बाजार समितीत गवारला अवघा शंभर रुपये क्विंटल, म्हणजेच केवळ एक रुपया किलो असा दर मिळत असल्याचे पाहून शेतकरी हादरून गेला.
दररोज दहा ते बारा मजुरांच्या मदतीने शेतातून गवार काढणी करण्यात येत होती. काढणी, वाहतूक आणि बाजारात नेण्याचा खर्चच निघत नसल्याने साहेबराव कारंडे यांचा संताप अनावर झाला. अखेर त्यांनी पेरेजपुर फाटा येथे गवारचे पोते रस्त्यावर रिकामे करत निषेध नोंदवला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गवार पसरल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
“शेती करायची तरी कशी? उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. मजुरी, खते, औषधे, डिझेल यांचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र बाजारात मालाला भावच मिळत नाही. एक रुपया किलो दराने विक्री करून आम्ही जगायचं कसं?” असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
यावेळी परिसरातील इतर शेतकरीही एकत्र आले होते. त्यांनी शासनाच्या कृषी धोरणावर नाराजी व्यक्त करत शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी केली. “शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून पीक घेतो, पण शेवटी त्याच्या हातात काहीच राहत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं कसं?” असा संतप्त प्रश्न उपस्थित करण्यात आला.
कृषी क्षेत्रातील असंतोष अधिक तीव्र होण्याची चिन्हे
गेल्या काही दिवसांपासून अनेक भाजीपाला पिकांचे दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बाजारात व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दर दिले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. यापूर्वीही टोमॅटो, कांदा, भेंडी आणि इतर पिके रस्त्यावर फेकून आंदोलन करण्यात आले होते. आता गवार उत्पादक शेतकऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळवून द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतकरी आणि बाजार व्यवस्थेतील दरी अधोरेखित झाली असून, कृषी क्षेत्रातील असंतोष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
