अवैध सावकारी प्रकरणातील चौकशी अहवाल अनुकूल पाठविण्यासाठी मागितले होते पाच लाख; तडजोडीनंतर तीन लाखांवर व्यवहार
धुळे (सुनील निकम) : अवैध सावकारी प्रकरणातील चौकशी अहवाल अनुकूल पाठवून तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या जळगाव येथील उप निबंधक सह संस्था कार्यालयातील अधिकाऱ्याला अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. तडजोडीनंतर तीन लाख रुपयांवर व्यवहार ठरल्यानंतर पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये खासगी इसमामार्फत स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. या घटनेमुळे जिल्ह्यातील सहकार विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील आरोपी जगदीश बाबुराव बारी (वय ५६, रा. शांतिनगर, यावल रोड, भुसावळ) हे उप निबंधक, सह संस्था, जळगाव येथे कार्यरत आहेत. तर देविदास धनसिंग पाटील (वय ४४, रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर, जळगाव) हे जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनचे मानद कार्यकारी अधिकारी असून त्यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध अवैध सावकारी व्यवसायासंदर्भात चौकशी सुरू होती. या प्रकरणाची सुनावणी उप निबंधक सहकारी संस्था, जळगाव तालुका कार्यालयात सुरू होती. चौकशी संदर्भात माहिती घेण्यासाठी तक्रारदार संबंधित कार्यालयात गेले असता, त्यांच्याविरुद्ध तसेच त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये आणि चौकशी अहवाल अनुकूल पाठविण्यासाठी उप निबंधक जगदीश बारी यांनी तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तक्रारदाराने १८ मे २०२६ रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने पंचासमक्ष पडताळणी केली असता लाच मागणीची खातरजमा झाली. पडताळणीदरम्यान आरोपी बारी यांनी पाच लाख रुपयांच्या मागणीवर तडजोड करत तीन लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यातील पहिला हप्ता म्हणून २० मे रोजी दीड लाख रुपये देविदास पाटील यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते.
ठरल्याप्रमाणे बुधवारी एसीबीच्या पथकाने जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लिमिटेड, बी. जे. मार्केट, जळगाव येथील कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून देविदास पाटील यांनी दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर मुख्य आरोपी उप निबंधक जगदीश बारी यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, बाळू मराठे, संगीता पवार, मनोज पाटील आणि सचिन चाटे यांच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.
दरम्यान, सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांकडून कामाच्या बदल्यात लाच मागितली जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असताना जळगाव एसीबीच्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे सहकार विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
