बनावट दस्तऐवजांच्या आधारे सरकारी जमीन हस्तगत करण्याचा आरोप; पारोळा तालुक्यात खळबळ
पिंप्री प्र.ऊ. शिवारातील गायरान जमिनीचा वाद | बनावट कागदपत्रे, खोट्या सह्या आणि बेकायदेशीर व्यवहारांचा आरोप | जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलिसांत गुन्हा दाखल
पारोळा (सुरेश पाटोळे) : पारोळा तालुक्यातील पिंप्री प्र.ऊ. शिवारातील गायरान (गुरचरण) जमिनीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाची दिशाभूल करून बनावट दस्तऐवज तयार करणे, खोटा मालकी हक्क दाखवणे आणि सरकारी जमिनीची बेकायदेशीर विक्री केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पारोळा तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून गायरान जमीन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
गायरान जमिनीवर बेकायदेशीर व्यवहाराचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्री प्र.ऊ. येथील गट क्रमांक १४० (सर्वे नं. ८४, ८५-अ आणि ८५-ब) ही गायरान जमीन असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधितांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्या आधारे खोटा मालकी हक्क दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच गायरान जमिनीवर अतिक्रमण करून नमुना ८-अ तयार करण्यात आला. त्यावर कथित खोट्या सह्या आणि शिक्के मारून सरकारी जमिनीची बेकायदेशीर विक्री करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
न्यायालयीन वाद सुरू असतानाही व्यवहार
या प्रकरणातील जमीन न्यायालयीन वादात असतानाही दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत आणि गहाणखत नोंदणी करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित जागेवर वित्तीय संस्थांकडून कर्ज उचलून आर्थिक फसवणूक केल्याचाही दावा करण्यात आला आहे.
दहा संशयितांविरोधात गुन्हा
या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून रामदास गुलाब पाटील, गोविंदा बाबुलाल पाटील, अरुणाबाई ब्रिजमोहन पाटील, ब्रिजमोहन बादशाह पाटील, मंगल भावराव पाटील, ज्ञानेश्वर विक्रम पाटील, उषाबाई शिवराम भिल, उषाबाई दत्तू पाटील, दत्तात्रय भिवसन पाटील आणि विलास तुकाराम पाटील (सर्व रा. पिंप्री प्र.ऊ., ता. पारोळा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०११ ते २०१८ या कालावधीत बनावट दस्तऐवजांच्या आधारे जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाई
या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पंचायत विस्तार अधिकारी संजिव सैंदाणे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकडे करीत आहेत.
