Spread the love

सोलापूरहून पुणे-दौंड वीटभट्टीवर नेल्याचा आरोप; प्रशासनाच्या मदतीने रेस्क्यू मोहीम यशस्वी

जळगाव : लोणवाडी येथील आदिवासी भिल्ल समाजातील १० ऊसतोड कामगारांना करार पूर्ण झाल्यानंतरही घरी येऊ न देता जबरदस्तीने पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरातील वीटभट्टीवर कामासाठी डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशासन आणि आदिवासी टायगर सेनेच्या पुढाकाराने अखेर या मजुरांची सुटका करण्यात आली.

ऊसतोडीसाठी गेले होते मजूर
मिळालेल्या माहितीनुसार, लोणवाडी गावातील दिपक महेश भिल, मंगल देवसिंग भिल, मिराबाई देवसिंग भिल, पिंटू गणसिंग भिल, रत्नाबाई पिंटू भिल, गणसिंग सोनू भिल, महेश आत्माराम भिल, वंदनाबाई महेश भिल, दिपक मिना भिल आणि दिपक देवसिंग भिल हे मजूर सोलापूर येथे ऊसतोडीच्या कामासाठी गेले होते. या मजुरांचा चार महिन्यांचा करार करण्यात आला होता. मात्र कराराची मुदत पूर्ण होऊनही त्यांना घरी परतू देण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वीटभट्टीवर विकल्याचा गंभीर आरोप
संबंधित मुकादम आणि मालकांनी काही पैशांच्या व्यवहारातून या मजुरांना पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरातील वीटभट्टीवर परस्पर पाठविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मजुरांकडून इच्छेविरुद्ध काम करून घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

आदिवासी टायगर सेनेचा पुढाकार
या घटनेची माहिती आदिवासी टायगर सेनेचे पदाधिकारी विनोद मोरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने पुणे-दौंड येथे रेस्क्यू मोहीम राबविण्यात आली.

मजुरांची सुखरूप सुटका
रेस्क्यू पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन सर्व मजुरांची सुखरूप सुटका केली. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी परत आणण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे ऊसतोड कामगारांच्या शोषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधित मुकादम आणि मालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version