उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; ३० हून अधिक गावांना होणार थेट फायदा
नशिराबाद (धीरज सतेवाल) : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नशिराबाद शहराला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच जळगाव तालुक्यातील वाढत्या महसुली कामांचा ताण कमी करण्यासाठी नशिराबाद येथे ‘अप्पर तहसील कार्यालय’ मंजूर करण्यात यावे, अशी मागणी नशिराबाद नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पंकज शामकांत महाजन यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीमुळे नशिराबादसह परिसरातील ३० हून अधिक गावांतील नागरिकांना महसुली कामांसाठी मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
ऐतिहासिक नशिराबादचे महत्त्व अधोरेखित
जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नशिराबादच्या ऐतिहासिक महत्त्वाचा उल्लेख करण्यात आला आहे. ब्रिटिश काळात नशिराबाद हे ‘परगणा’ केंद्र होते. त्या काळात येथे तहसील कार्यालय, न्यायालय तसेच फाशीची शिक्षा देण्याची व्यवस्थाही अस्तित्वात होती. व्यापार आणि महसुली कामांचे हे महत्त्वाचे केंद्र म्हणून नशिराबादची ओळख होती.
स्वातंत्र्यानंतर जळगाव तालुका आणि जिल्ह्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाल्याने महसुली कामांचा ताण वाढला असून प्रशासकीय कामकाजात विलंब होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
३० पेक्षा अधिक गावांना होणार सुविधा
शासनाने २ एप्रिल २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर आणि जळगाव तालुक्यात अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. हे कार्यालय नशिराबाद येथे मंजूर झाल्यास उमाळा, देव्हारी, चिंचोली, धानवड, भागपूर, कुसुंबे खुर्द, कंडारी, रायपूर, मन्यारखेडा, बेळी, निमगाव, तिघ्रे, खिर्डी, कानसवाडे, भोलाणे, आसोदा, तरसोद, ममुराबाद, इदगाव, धामणगाव, खापरखेडा यांसह ३० हून अधिक गावांतील नागरिकांना महसुली कामांसाठी जळगाव शहरात जावे लागणार नाही.
नगरपालिकेकडून जागा देण्याची तयारी
नशिराबाद येथे नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर शहराच्या विकासाला गती मिळाली आहे. अशा परिस्थितीत अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्यास शहराच्या विकासात आणखी भर पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या कार्यालयासाठी आवश्यक जागा नशिराबाद नगरपरिषदेतर्फे मोफत उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याची ग्वाही उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक आणि तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर राहुल सुरेश चौधरी, रविंद्र संतोष चौधरी, मुरलीधर गोविंदा पवार, दिलीप वासुदेव कोळी, वैभव संजय गोसावी, भूषण भानुदास कोल्हे आणि संदीप विष्णू पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
