Spread the love

UPSC, MPSC, JEE आणि NEET साठी संपूर्ण मोफत प्रशिक्षण; ‘सतपंथ’ आणि ‘नोबेल फाउंडेशन’चा प्रेरणादायी उपक्रम

जळगाव : आर्थिक परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षांचे स्वप्न अपूर्ण राहणाऱ्या ग्रामीण आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी जळगावात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट आणि नोबेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील ५० गरजू युवक-युवतींसाठी विनामूल्य निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात UPSC, MPSC, JEE आणि NEET परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “देशाला आज सुसंस्कृत, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे. तरुणांनी प्रशासकीय सेवेत येऊन आपल्या कर्तृत्वातून देशाच्या विकासात योगदान द्यावे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, संयम आणि कठोर परिश्रम हाच यशाचा खरा मंत्र आहे,” असे ते म्हणाले.

“प्रत्येक बाबा भोंदू नसतो”; अंधश्रद्धेवर जनार्दन महाराजांचा प्रहार
यावेळी जनार्दन महाराजांनी अंधश्रद्धेवरही भाष्य करत समाजाला महत्त्वपूर्ण संदेश दिला.

“विद्यार्थ्यांनी मला ‘बाबा’ म्हणावे, जेणेकरून समाजात हा संदेश जाईल की प्रत्येक बाबा भोंदू नसतो. जर समाज बाहेरून आलेल्या लोकांना करोडो रुपये देऊ शकतो, तर गरिबांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्यांच्या पाठीशीही ठामपणे उभे राहिले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून यशाचा प्रकाश पेरण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

“प्रत्येक तालुक्यात अशी केंद्रे उभी राहावीत” – मंत्री संजय सावकारे
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. “आज स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेसच्या वाढत्या फीमुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मागे पडत आहेत. अशा परिस्थितीत नोबेल फाउंडेशन आणि जयदीप पाटील यांनी उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे. भविष्यात प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारची केंद्रे सुरू व्हावीत यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन,” अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी या प्रकल्पाचे स्थानिक पालकत्व स्वीकारल्याचा आनंद व्यक्त केला, तर आमदार अमोल जावळे यांनीही संस्थेच्या पाठीशी कायम उभे राहण्याचे आश्वासन दिले.

“मागे राहिलेल्यांना हात देणे हीच खरी संस्कृती”
नोबेल फाउंडेशनचे संस्थापक Jaydeep Patil यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “मी स्वतः ग्रामीण भागातून आणि गरिबीतून शिक्षण घेत इथपर्यंत पोहोचलो आहे. आपण पुढे गेल्यानंतर मागे राहिलेल्यांना हात देणे हीच खरी संस्कृती आणि आई-वडिलांचे संस्कार आहेत.”

विद्यार्थ्यांना ग्रंथभेट, मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला श्यामचैतन्य महाराज, उपमहापौर मनोज चौधरी, जैन उद्योग समूहाचे मीडिया उपाध्यक्ष अनिल जोशी, रायसोनी विद्यालयाचे डीन संजय शेखावत, उद्योजक प्रवीणभाई पटेल, कांतीभाई पटेल, एस. जे. पाटील, सचिव संजय महाजन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन राजेंद्रसिंग राजपूत यांनी केले, तर आभार प्रदर्शन शैलेंद्र महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश पाटील, राजेंद्र पाटील, प्रशांत पाटील आणि प्रेम मराठे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version