“ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हा”; राज्यभरातील आंबेडकरवादी नागरिकांना उपस्थितीचे आवाहन
ठाणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या स्थापनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असून, या शतक महोत्सवी वर्षानिमित्त ३१ मे २०२६ रोजी ठाणे येथे राज्यस्तरीय भव्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनास राज्यभरातील समता सैनिक, आंबेडकरवादी विचारांचे अनुयायी, मानवतावादी आणि लोकशाहीवादी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांनी केले आहे.
समता सैनिक दल ही सामाजिक न्याय, समता आणि संविधान रक्षणासाठी कार्य करणारी ऐतिहासिक संघटना असून, अनेक दशकांपासून संघटना निष्क्रिय अवस्थेत गेल्याचे चित्र होते. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांत समता सैनिक दलाने नव्या उमेदीने राज्यभरात पुन्हा संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. आज राज्यातील तब्बल २५ जिल्ह्यांमध्ये संघटना सक्रियपणे कार्यरत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
धर्मभूषण बागुल यांनी सांगितले की, “बाबासाहेबांचे उपकार मानणारा प्रत्येक व्यक्ती त्यांच्या विचारांच्या संघटनेशी जोडला गेला पाहिजे. सामाजिक परिवर्तनासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी समता सैनिक दल मजबूत होणे ही काळाची गरज आहे.”
१३ मार्च २०२६ रोजी समता सैनिक दलाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणारे हे अधिवेशन राज्यातील आंबेडकरवादी चळवळीसाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे. या अधिवेशनात सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार असून राज्यभरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित सामाजिक बांधिलकी मजबूत करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला जाणार आहे.
दरम्यान, राज्य कार्यकारिणीच्या वतीने सर्व नागरिकांना कुटुंबासह व मित्रपरिवारासह या अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, “ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हा” असा संदेश देण्यात आला आहे.
