Spread the love

प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; CBI चौकशीसह फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची मागणी

धुळे (सुनील निकम) : वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या NEET UG 2026 परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात संघटनेच्या धुळे शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, देशभरातील तब्बल २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या NEET परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. पेपरफुटीप्रकरणी संबंधित रॅकेट, भ्रष्ट अधिकारी तसेच दोषी आढळणाऱ्या खाजगी क्लासेस चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

संघटनेने स्पष्ट केले की, “प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन” ही संघटना गेल्या २६ वर्षांपासून प्रामाणिक आणि सर्वसामान्य क्लास चालकांच्या हितासाठी कार्यरत आहे. जर या प्रकरणात कोणत्याही क्लास संचालकांचा सहभाग आढळला, तर त्यांच्या पाठीशी संघटना उभी राहणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) चौकशी सुरू असून, सर्व दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील गुन्हेगारांवर जलदगतीने खटले चालवण्यासाठी स्वतंत्र फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

NEET सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटींना आळा घालण्यासाठी परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ऑनलाइन परीक्षा पद्धती, कडक सुरक्षा यंत्रणा, NTA च्या कारभारात पारदर्शकता तसेच परीक्षा विविध सत्रांमध्ये घेण्याची मागणी संघटनेने केली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुढील वर्षापासून NEET परीक्षा संगणकाधारित (ऑनलाइन) पद्धतीने घेण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. JEE प्रमाणे वर्षातून दोन वेळा NEET परीक्षा घेऊन विविध स्लॉटमध्ये परीक्षा आयोजित कराव्यात आणि गुणांच्या सामान्यीकरणासाठी Percentile पद्धतीचा वापर करावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

तसेच UPSC प्रमाणे भारतीय राज्यघटनेअंतर्गत स्वतंत्र घटनात्मक परीक्षा संस्था स्थापन करून तिच्यामार्फत NEET परीक्षा घेण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी संघटनेने सरकारकडे केली आहे. या निवेदनावर प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र, धुळे शाखेचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद जोशी, जिल्हा प्रमुख (प्रा. विभाग) निंवा खैरनार सर तसेच जिल्हा सचिव एम. डी. चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version