Spread the love

गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शेतातून अटक; शिंदखेडा पोलिसांच्या ताब्यात

दोंडाई (सुनील निकम) : शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथे २०२४ मध्ये घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल २० महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला दोंडाईचा पोलिसांनी अखेर जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपीला जुने कोळदे येथील एका शेतातून ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी शेवाळे (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे दीपक रतिलाल मालचे यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३५/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३(५) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मुकेश सुरेश मोरे (भिल) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. पोलिसांकडून त्याचा सातत्याने शोध सुरू होता. दरम्यान, दि. २५ मे २०२६ रोजी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांना आरोपी जुने कोळदे येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक इमरान शेख यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाचा वापर करत आरोपीचा माग काढला आणि जुने कोळदे येथील एका शेतातून त्याला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मुकेश सुरेश मोरे (भिल), वय २३, रा. शेवाळे ता. शिंदखेडा जि. धुळे असे आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच शिरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, पोउनि इमरान शेख, पोलीस अंमलदार हिरालाल सूर्यवंशी, प्रविण निकुंभे, निलेश हालोरे, निलेश धनगर, हर्षल सोनवणे, राकेश रोकडे, अमोल पाटील तसेच होमगार्ड अमिन शहा यांनी सहभाग घेतला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version