Spread the love

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उभा केला प्रेरणादायी संघर्ष; जळगावच्या रणरागिणीचा सन्मान

जळगाव : सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘सैनिक रत्न’ पुरस्कार वीरपत्नी श्रीमती ज्योत्स्ना अशोक अहिरे यांना जाहीर करण्यात आला आहे. पतीच्या निधनानंतर आलेल्या कठीण परिस्थितीतही न खचता जिद्द, संघर्ष आणि कर्तृत्वाच्या बळावर उभे राहून त्यांनी समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

ज्योत्स्ना अहिरे यांचे पती वीर जवान अशोक शंकर अहिरे हे अवघ्या १८ व्या वर्षी भारतीय सैन्यातील २ महार रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. त्यांनी लेह-लडाख, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानसारख्या अत्यंत प्रतिकूल व संवेदनशील सीमाभागात देशसेवा बजावली. मात्र, प्रकृती खालावल्याने १६ मार्च २०१६ रोजी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले.

पतीच्या निधनावेळी ज्योत्स्ना ताई केवळ २८ वर्षांच्या होत्या. पदरात मुलगी मेघा आणि मुलगा प्रणव अशी दोन लहान मुले असताना त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या संकटातही त्यांनी हार मानली नाही. शिक्षण अपूर्ण असतानाही त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू करत B.A., MS-CIT आणि टायपिंगचे शिक्षण पूर्ण केले.

त्यांच्या संघर्षाचे फळ आज त्यांच्या मुलांच्या यशातून दिसून येत आहे. मुलगी मेघा १२ वी विज्ञान शाखेत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाली असून सध्या NEET आणि CET परीक्षांची तयारी करत आहे. तर मुलगा प्रणव वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत देशसेवेचे स्वप्न पाहत आहे.

सध्या ज्योत्स्ना अहिरे या जळगाव MIDC मधील BPCL प्लांटमध्ये कार्यरत असून नोकरीसह घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. त्याचबरोबर त्या सैनिक फेडरेशनच्या पदाधिकारी म्हणून तसेच विविध सामाजिक संघटनांमधून सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या धैर्य, त्याग आणि जिद्दीच्या प्रवासाचा गौरव करत सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याने त्यांना ‘सैनिक रत्न’ पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेक महिलांसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version