प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाकडे निवेदन, जीएम रामाश्रय पांडे व डीआरएम पंकज सिंह यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा; स्थानिक प्रवाशांच्या सुविधेसाठी पाठपुरावा
पाळधी : धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या प्रवासी गाड्यांना अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी मागणी युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) रामाश्रय पांडे आणि भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) पंकज सिंह यांच्या पाळधी रेल्वे स्थानक दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले तसेच विविध स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाळधी हे धरणगाव तालुक्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून परिसरातील अनेक गावांतील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार वर्ग तसेच उपचारासाठी प्रवास करणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवेवर अवलंबून आहेत. मात्र, अनेक महत्त्वाच्या गाड्यांना येथे थांबा नसल्याने प्रवाशांना भुसावळ किंवा जळगाव येथे जाऊन रेल्वे पकडावी लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि अतिरिक्त श्रमांचा मोठा भुर्दंड सहन करावा लागत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रतापराव पाटील यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडणी करताना सांगितले की, विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी, शेतकऱ्यांना कृषी कामांसाठी तसेच रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या, प्रवाशांची संख्या आणि भविष्यातील गरज लक्षात घेता काही महत्त्वाच्या गाड्यांना पाळधी रेल्वे स्थानकावर थांबा देणे अत्यावश्यक झाले आहे.
यावेळी त्यांनी गाडी क्रमांक १२१११ सूरत–अमरावती एक्सप्रेस, गाडी क्रमांक १९००७ सूरत–भुसावळ एक्सप्रेस तसेच गाडी क्रमांक १९००३ खान्देश एक्सप्रेस (वांद्रा टर्मिनस–भुसावळ) या गाड्यांना पाळधी रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा देण्याची मागणी केली. या गाड्यांचा थांबा मिळाल्यास हजारो प्रवाशांची मोठी सोय होणार असून स्थानिक नागरिकांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पाळधी परिसरातील वाढती प्रवासी संख्या, रेल्वे प्रवासातील अडचणी आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीने रेल्वे थांब्याचे महत्त्व याबाबत प्रतापराव पाटील यांनी दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी या मागणीचा सकारात्मक आणि गांभीर्याने विचार केला जाईल, अशी भूमिका व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली. प्रतापराव पाटील यांनी सांगितले की, रेल्वे थांबा मंजूर झाल्यास केवळ प्रवाशांची सुविधा होणार नाही, तर परिसरातील आर्थिक, व्यापारी आणि शैक्षणिक विकासालाही चालना मिळेल. पाळधी रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी भविष्यातही सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी सरपंच अरुण पाटील, प्रशांत झंवर, धनराज कासट, अनिल माळी, दिलीप माळी, राकेश धनगर, योगेश माळी, भूषण महाजन, राहुल बिऱ्हाडे, प्रवीण पाटील, चंदन कळमकर, राहुल चौधरी, मुकेश भोई, दीपक कोळी, हर्षल कोळी, योगेश माळी यांच्यासह जीपीएस ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.
