खाद्य तेल मिसळून तयार होत होते बनावट दूध; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
भवरखेडे (अजय बाविस्कर) : धरणगाव तालुक्यातील भवरखेडे येथे खाद्य तेलाचा वापर करून बनावट दूध तयार करणाऱ्या व्यक्तीवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत मोठा भेसळप्रकार उघडकीस आणला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, दुधाच्या भेसळीविरोधात प्रशासन आता पूर्णपणे ॲक्शन मोडवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.
अन्न व औषध प्रशासन, जळगाव विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) दीनानाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे, शरद पवार, आकाश बोराडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
दुसऱ्यांदा कारवाई; दूध व खाद्यतेलाचे नमुने जप्त
मुंबई येथील आयुक्त तुकाराम मुंढे तसेच नाशिक विभागाचे सहआयुक्त एस. आर. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने भवरखेडे येथील सोमनाथ आनंदा माळी यांच्या घरावर छापा टाकला.
तपासणीदरम्यान दुधात खाद्यतेलाची भेसळ होत असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीवर यापूर्वीही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. पथकाने दोन गायीच्या दुधाचे नमुने आणि एक खाद्यतेलाचा नमुना विश्लेषणासाठी ताब्यात घेतला. तसेच उर्वरित दुधाचा साठा पंच रेखा नंदकिशोर पाटील आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.
आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न
कारवाई सुरू असताना आरोपी सोमनाथ माळी याने लघुशंकेचा बहाणा करत घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रशासनाने याची गंभीर दखल घेत त्याच्याविरोधात धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक २०७/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
“भेसळ करणाऱ्यांची खैर नाही”
या प्रकरणानंतर सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी दुधात किंवा इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला. परिसरात कुठेही बनावट दूध किंवा भेसळीचा प्रकार सुरू असल्यास नागरिकांनी तात्काळ टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. या कारवाईमुळे भवरखेडे परिसरात मोठी चर्चा रंगली असून, नागरिकांनी प्रशासनाच्या या धाडसी कारवाईचे स्वागत केले आहे.
