Spread the love

नारपार-गिरणा जोड प्रकल्पाला गती अन् अहिरानी भाषेला जागतिक ओळख; खान्देशासाठी दोन संघटनांचं ऐतिहासिक योगदान

खान्देश : खान्देशच्या विकासासाठी आणि माय अहिरानी भाषेच्या संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून झटणाऱ्या दोन संघटनांना एकाच काळात मोठं यश मिळाल्याने संपूर्ण खान्देशात अभिमानाचं वातावरण निर्माण झालं आहे. पाणी आणि संस्कृती या दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या खान्देश हित संग्राम संघटना आणि उत्तर महाराष्ट्र विकास मंडळ यांच्या प्रयत्नांना आता यशाचं फळ मिळताना दिसत आहे.

खान्देश हित संग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भय्यासाहेब पाटील आणि उत्तर महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष प्रा. विकास पाटील या दोघांनी आपल्या संघटनांच्या माध्यमातून खान्देशच्या हितासाठी विविध पातळ्यांवर लढा उभारला आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेते जामनेर तालुक्यातील असून, सामाजिक बांधिलकी आणि खान्देशप्रेमातून त्यांनी मोठं कार्य उभं केलं आहे.

नारपार-गिरणा प्रकल्पामुळे सुटणार पाण्याचा प्रश्न
खान्देश हित संग्राम संघटना गेल्या २५ वर्षांपासून विविध मूलभूत प्रश्नांसाठी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करत आहे. रेल्वे आंदोलन, कल्याण येथे खान्देश भवन उभारणीसाठीचा लढा, तसेच अहिराणी भाषेत लग्नपत्रिका छापण्याची चळवळ अशा अनेक उपक्रमांमधून संघटनेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

संघटनेची सर्वात मोठी आणि महत्त्वाची मागणी म्हणजे “नारपार-गिरणा, दमनगंगा-गोदावरी नदीजोड प्रकल्प”. आता या प्रकल्पासाठी कार्यारंभ आदेश मिळाल्याने खान्देशातील पाणीप्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १० टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, त्याचा फायदा पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीही होणार आहे.

अहिरानी भाषेला मिळाली जागतिक झेप
दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र विकास मंडळाने “खान्देश ग्लोबल महोत्सवा”च्या माध्यमातून खान्देशची संस्कृती, गीत-संगीत, नृत्य आणि खानपान परंपरा जपण्याचे मोठे कार्य केले आहे. कोरोना काळात मंडळाने आयोजित केलेल्या पहिल्या ऑनलाइन जागतिक अहिरानी भाषा संमेलनात तब्बल २७ देशांतील अहिरानी भाषिक सहभागी झाले होते.

या संमेलनाचे फोटो, व्हिडिओ आणि भाषिक पुरावे भाषा तज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या मार्गदर्शनाखाली भाषा विज्ञान भवन, बंगलुरू तसेच युनेस्कोकडे पाठवण्यात आले होते. त्यानंतर सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे आज अहिरानी भाषेला डिजिटल आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळत असल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, गुगल की-बोर्डवर अहिरानी भाषेला स्वतंत्र स्थान मिळवून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. “माय अहिरानी” आता केवळ बोली भाषा न राहता लिखित स्वरूपातही अधिक सक्षमपणे पुढे येत असल्याची भावना खान्देशवासीय व्यक्त करत आहेत.

“पाणीचं संवर्धन आणि वाणीचं जतन”
खान्देश हित संग्राम संघटनेने पाण्याच्या प्रश्नावर काम करत जलसंवर्धनाचा लढा उभारला, तर उत्तर महाराष्ट्र विकास मंडळाने भाषेच्या जतनासाठी सांस्कृतिक चळवळ उभी केली. त्यामुळे “एक संघटना जलसंवर्धनासाठी, तर दुसरी वाणीच्या संवर्धनासाठी” अशी भावना आता खान्देशात व्यक्त होत आहे. “घरेघर संदेश, सोनाना खान्देश… आपली भाषा, आपली वाणी… अहिरानी माय अहिरानी…” या घोषणांमधून खान्देशी अस्मिता अधिक ठळक होताना दिसत आहे. लेखक मनोहर वसंत खैरनार यांनी आपल्या लेखातून नमूद केल्याप्रमाणे, “हातात सत्ता नाही, खिशात पैसा नाही; पण मातृभूमी, भाषा आणि संस्कृतीवरील प्रेमाच्या जोरावर मोठं काम उभं राहू शकतं,” हे या दोन्ही संघटनांनी सिद्ध करून दाखवले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version