Spread the love

फातेमानगरातील ३६ खोली परिसरात सुरू होता अवैध व्यवसाय; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नशिराबाद : येथील फातेमानगर परिसरात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तल प्रकरणावर नशिराबाद पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत ९ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १२ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ मे २०२६ रोजी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या आपल्या पथकासह परिसरात गस्त घालत होत्या. त्यावेळी त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फातेमानगरमधील ३६ खोली परिसरात काही इसम अवैधरित्या गोवंश कत्तलीचा व्यवसाय करत आहेत. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकण्यात आला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून ३ गायी, १ बैल, ९ गोऱ्हे आणि २ लहान वासरे अशी जनावरे ताब्यात घेतली. तसेच सुमारे २०० किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारे चाकू, सत्तूर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी नासिर शहा दिलावर शहा (वय ४१), शब्बीर शहा दिलावर शहा (वय ३२), अबरार शेख अन्सार मन्यार (वय २६), शेख रफीक शेख इसाक (वय ३८), अकबर सत्तार खाटीक (वय ४९), आदील शरिफ चौधरी (वय ३४), सोहेल शरिफ चौधरी (वय ३०), परवीन मुक्तार कुरेशी (वय ३५) आणि मुक्तार जमाल कुरेशी (वय ४०) या नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी हे फातेमानगर व रामनगर एमआयडीसी परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या सर्व आरोपींविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३२५, २७५ तसेच महाराष्ट्र प्राणीसंवर्धन अधिनियम कलम ५, ५(क), ९ आणि ९(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरेष पाटील करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र तायडे, हरेष पाटील, सहाय्यक फौजदार शरद सोनार, राजेश मेंढे तसेच पोलीस अंमलदार चंद्रकांत पाटील, गुणवंत देशमुख, प्रशांत विरनारे, कमलाकर बागुल, भारत बाविस्कर, पंकज सोनवणे, विठ्ठल मुंडे, सागर बिडे, विजय अहिरे, भूषण पाटील आणि रामकृष्ण माळी यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version