लग्न ठरलेल्या तरुणाने प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबीयांचा घातपाताचा संशय
जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून नैराश्यात गेलेल्या एका तरुणाने आपल्या अल्पवयीन प्रेयसीसोबत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून फास तुटल्याने अल्पवयीन मुलगी बचावली आहे. या घटनेमुळे पाचोरा परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.
ही घटना पाचोऱ्याच्या गोराडखेडे रोडवरील एका लॉजमध्ये गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. रवींद्र संजय मोरे (वय २५, रा. गिरड, ता. भडगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. रवींद्र आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी हे सकाळी सुमारे १० वाजता संबंधित लॉजमध्ये आले होते. काही वेळानंतर दोघांनीही खोलीत गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
माहितीनुसार, दोघांनी पंख्याला फास लावला होता. मात्र, मुलीच्या बाजूचा फास अचानक तुटल्याने ती खाली पडली आणि तिचा जीव वाचला. मात्र रवींद्रचा फास न तुटल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. घाबरलेल्या मुलीने तात्काळ लॉज कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत रवींद्रला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, रवींद्र मोरे याचा विवाह महिनाभरापूर्वीच ठरला होता आणि लग्न काही दिवसांवर आले होते. मात्र त्याचे प्रेम दुसऱ्या मुलीवर असल्याने तो मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, रवींद्रच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे. हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असून तिने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तिचा जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणातील अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे. पाचोरा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
