“नियोजित आराखड्यात नसलेला थांबा राजकीय दबावातून”; काम तात्काळ थांबवण्याची मागणी
मेट्रो प्रशासनाने तातडीने चौकशी करून काम थांबवावे – सचिन काळभोर
पिंपरी-चिंचवड : निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पातील प्रस्तावित स्टेशन थांब्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी सिग्नल परिसरात फॉरमायका कंपनीच्या जागेवर सुरू असलेल्या नव्या बांधकाम प्रकल्पाला फायदा करून देण्यासाठीच मेट्रो स्टेशन थांबा मुद्दाम त्या ठिकाणी घेण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी अधिकृत आक्षेप नोंदवत संबंधित काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून निगडी सिग्नलच्या डाव्या बाजूस असलेल्या फॉरमायका कंपनीच्या जागेवर एका खासगी बिल्डरकडून मोठ्या इमारत प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. याच प्रकल्पाच्या कॉर्नरवर मेट्रो स्टेशन थांबा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात संबंधित बिल्डरला व्यापारी आणि आर्थिक लाभ मिळावा यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
सचिन काळभोर यांनी म्हटले आहे की, निगडी बस स्टॉप हा आधीपासूनच मुंबई-पुणे महामार्गावरील मुख्य वाहतूक केंद्र असून नियोजित मेट्रो स्टेशन थांबा याच ठिकाणी असणे अपेक्षित होते. मात्र अचानक दुसऱ्या ठिकाणी स्टेशन थांबा नेण्यात आल्याने संशय निर्माण झाला आहे. त्यांनी आरोप केला की, नियोजित स्ट्रक्चर प्लॅनमध्ये नसलेला हा मेट्रो स्टेशन थांबा राजकीय दबाव आणि आर्थिक तडजोडीतून मंजूर करण्यात आला आहे.
यासंदर्भात मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अधिकृत आक्षेप दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन निगडी ते पिंपरी मेट्रो स्टेशन थांब्याचे सुरू असलेले काम थांबवावे, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या आरोपांमुळे निगडी-पिंपरी मेट्रो प्रकल्पाबाबत शहरात चर्चांना उधाण आले असून मेट्रो प्रशासन आणि संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांची भूमिका काय असणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
