Spread the love

१२ हून अधिक मृत्यूंनंतर पोलिस आयुक्तांचा कठोर निर्णय; निष्काळजीपणा आणि कर्तव्यातील हलगर्जीपणाचा ठपका

पुणे : राज्याला हादरवून सोडणाऱ्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणात पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या दुर्दैवी घटनेत १२ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुणे शहर पोलिस दलातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित आदेश जारी केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात विषारी दारू सेवनामुळे सुरुवातीला आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर हडपसर परिसरात आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने एकूण मृतांचा आकडा १२ पेक्षा अधिक झाला. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून अवैध दारू विक्रीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान अवैध दारू विक्रीबाबत माहिती असूनही प्रभावी कारवाई करण्यात संबंधित अधिकाऱ्यांनी कुचराई केल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, हडपसर पोलीस चौकीच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांचा समावेश आहे.

पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशात संबंधित अधिकाऱ्यांवर कर्तव्यातील हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि अवैध दारूविरोधात प्रभावी कारवाई करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या घटनेमुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून विषारी दारूच्या उत्पादन, पुरवठा आणि विक्रीच्या संपूर्ण साखळीचा तपास सुरू आहे. मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

या घटनेनंतर राज्यभरातील अवैध दारू व्यवसायावर व्यापक मोहीम राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंमुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version