Spread the love

पुणे महापालिकेतील सफाई कामगार व मेहत्तर वाल्मिकी समाजाच्या मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि आदर्श मातांचा गौरव; कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर एका महिन्यात न्याय देण्याचे आश्वासन

पुणे (शंकर जोग) : अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आणि पुणे महानगरपालिका युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सफाई कामगार व मेहत्तर वाल्मिकी समाजाचा भव्य मेळावा पर्वती दर्शन येथील राजीव गांधी ई-लर्निंग अकॅडमीच्या विजय तेंडुलकर सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आदर्श व्यक्तिमत्त्व समोर ठेवून कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर शिक्षणामध्ये उत्तुंग भरारी घ्यावी,” असे प्रेरणादायी आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेच्या वतीने अण्णा बनसोडे यांचा तुकाराम महाराजांची पगडी, शाल आणि विठ्ठल-रुक्मिणी यांची प्रतिमा देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपालराव तंतरपाळे होते.

यावेळी दहावी आणि बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेतील कर्तव्यदक्ष सफाई कामगार तसेच समाजातील आदर्श मातांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कामगार चळवळीतील योगदानाबद्दल कामगार नेते तथा माजी नगरसेवक सुनिल शिंदे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका
मार्गदर्शन करताना अण्णा बनसोडे यांनी पुणे महानगरपालिकेतील कामगारांचे प्रलंबित प्रश्न आणि उच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भातील बाबी गांभीर्याने घेतल्या जातील, असे स्पष्ट केले. संबंधित विषयांवर महापालिका आयुक्तांशी चर्चा करून कामगारांना एका महिन्याच्या आत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण महत्त्वाचे
कार्यक्रमातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देताना समाजाप्रती बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून युवकांनी ज्ञान, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधावा, असे मतही व्यक्त करण्यात आले.

मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती
या मेळाव्यास नगरसेवक निलेश आल्हाट, वैशाली भालेराव, सुरज लोखंडे, दिलीप काळोखे, माजी नगरसेवक सचिन तावरे, प्रशांत लोखंडे, विकास कुचेकर, कविराज संघेलिया, डॉ. अनुपकुमार बेगी, नरोत्तम चव्हाण, कणव चव्हाण, महेंद्र चव्हाण, मनोज लालबिगे, अनिल जेधे, रवि वाघेला, बालाजी आळंदीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन परवीनताई लालबिगे (महाराष्ट्र राज्य प्रमुख, इंडियन क्राईम कंट्रोल कौन्सिल) यांनी केले होते. कार्यक्रमाचे निमंत्रक राष्ट्रीय अध्यक्ष सतीश लालबिगे होते. धर्मेंद्र सडेकर, ज्ञानेश्वर माने, आनंद भिंगारदिवे, रवि बेंगळे, सूर्यकांत यादव, तेजस्विनी सडेकर आणि शोभा भांडगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी सडेकर यांनी केले, तर नगरसेवक निलेश आल्हाट यांनी उपस्थितांचे आभार मानले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, कामगारांच्या प्रश्नांना न्याय आणि समाजातील आदर्श व्यक्तींचा सन्मान या त्रिसूत्रीवर आधारित हा मेळावा सामाजिक एकात्मता आणि शैक्षणिक प्रोत्साहनाचा प्रेरणादायी उपक्रम ठरला. सफाई कामगार व मेहत्तर वाल्मिकी समाजाच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version