Spread the love

धुळ्यात महिलांचा शासनाविरोधात संताप, कागदपत्रांची पूर्तता करूनही महिनोनमहिने पैसे जमा नाहीत

शासकीय कार्यालयांच्या उंबरठ्यावर महिलांच्या चकरा

धुळे (सुनील निकम) : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीबाबत धुळ्यात अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाच्या निर्देशानुसार ई-केवायसी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही अनेक महिलांना गेल्या काही महिन्यांपासून योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप समोर आला आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, शासनाने तातडीने प्रलंबित लाभाची रक्कम खात्यात जमा करावी, अशी मागणी होत आहे.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू केलेल्या या योजनेतून लाखो महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यभरात महिलांनी ई-केवायसीसाठी शासकीय कार्यालये, सेवा केंद्रे आणि बँकांमध्ये मोठी गर्दी केली. त्याचवेळी अनेक महिलांनी मुदतवाढ देण्याची मागणीही केली होती.

‘सर्व कागदपत्रे दिली, तरी पैसे मिळाले नाहीत’
धुळे शहरातील लाभार्थी महिला आशाबाई कैलास सोनवणे यांनी सांगितले की, शासनाने घालून दिलेल्या सर्व अटी पूर्ण करून ई-केवायसी केली, आवश्यक कागदपत्रे सादर केली, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या खात्यावर योजनेची रक्कम जमा झालेली नाही. वारंवार चौकशी करूनही स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

त्यांच्या मते, गरजू महिलांना लाभ मिळण्याऐवजी काही पात्र महिलाच लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने अशा प्रकरणांची स्वतंत्र पडताळणी करून तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

पाच महिन्यांपासून कार्यालयांचे उंबरठे झिजवत असल्याची तक्रार
धुळे तालुक्यातील हेंकळवाडी येथील गोडमबाई चव्हाण यांनीही अशीच व्यथा मांडली. त्यांनी सांगितले की, योजनेचा लाभ सुरुवातीला नियमित मिळत होता. मात्र शासनाच्या नव्या निर्देशांनुसार ई-केवायसी करून सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही गेल्या पाच महिन्यांपासून खात्यावर कोणतीही रक्कम जमा झालेली नाही. यासाठी अनेक वेळा संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन चौकशी केली, परंतु अद्याप समस्या सुटलेली नाही. वारंवार कार्यालयीन फेऱ्या मारूनही लाभ मिळत नसल्याने त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली.

लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मागणी
धुळ्यातील अनेक महिलांनी अशाच स्वरूपाच्या तक्रारी केल्या असून, ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतरही लाभ थांबविण्यात आल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने लाभार्थ्यांच्या प्रकरणांची तातडीने छाननी करून पात्र महिलांच्या खात्यात प्रलंबित रक्कम जमा करावी, अशी मागणी महिलांकडून होत आहे. दरम्यान, योजनेच्या अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणी, पडताळणी प्रक्रिया किंवा इतर कारणांमुळे लाभ रोखला गेला आहे का, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version