Spread the love

एकेरी वाहतुकीमुळे वाहनचालक हैराण; पर्यायी मार्गांच्या माहितीअभावी नागरिकांचा संताप

कल्याण (संदीप शेंडगे) :  टिटवाळा येथील नांदप रोडवर सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. टिटवाळा रेल्वे स्थानक, वाजपेयी चौक, निमकर नाका आणि उड्डाणपूल यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रीटीकरण सुरू असल्याने वाहतुकीसाठी केवळ एकेरी मार्ग उपलब्ध असून वारंवार कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कामाच्या ठिकाणी पुरेशी वाहतूक व्यवस्था नसल्याने तसेच पर्यायी मार्गांबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध करून न दिल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा आरोप
स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्याच्या कामाला सुरुवात करताना प्रशासनाने पर्यायी मार्गांची माहिती देणे आणि संबंधित दिशादर्शक फलक उभारणे आवश्यक होते. मात्र, कामाच्या ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काम सुरू असलेल्या परिसरात वाहतूक नियोजनाचा अभाव आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांची गैरसोय वाढल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न
वाहतूक कोंडीबरोबरच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी, मुरूम आणि इतर बांधकाम साहित्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. दुकानदारांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसत असून ग्राहकांची ये-जा कमी झाल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

महापालिकेकडून लवकरच दिलासा देण्याचे आश्वासन
याबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपअभियंता हरून इनामदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची दखल घेतली. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संबंधित ठेकेदाराला पर्यायी मार्ग दर्शविणारे फलक तातडीने लावण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
रस्त्याचे काँक्रीटीकरण हे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरी त्यादरम्यान नागरिकांची गैरसोय कमीत कमी राहील यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे. वाहतूक नियोजन, दिशादर्शक फलक, सुरक्षा उपाय आणि कामाचा वेग वाढवून ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version