सामाजिक बांधिलकी जपत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग; अनेक मान्यवरांची उपस्थिती
धुळे (सुनील निकम) : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजोपयोगी उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात युवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
या रक्तदान शिबिराचे आयोजन आम आदमी पार्टीचे अध्यक्ष महेंद्र नाना साळुंखे व उपाध्यक्ष रामकृष्ण चिंतामण पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ, नगरसेवक मोहन बालाजी सातपुते, शिवसेना शहरप्रमुख नितीन नळे, डॉ. अनिल शिंदे, भैरवी पलांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांनीही शिबिरात सहभाग नोंदवून उपक्रमाला पाठिंबा दिला.
यावेळी अनेक युवकांनी रक्तदान करत समाजसेवेचा संदेश दिला. विशेषतः सामाजिक कार्यात सक्रिय असलेले युवा कार्यकर्ते ललित भाऊ सातपुते यांनी रक्तदान करून इतर युवकांसमोर आदर्श निर्माण केला. रक्तदान हे सर्वोत्तम दान मानले जाते. अशा उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा उपक्रम समाजसेवा आणि मानवतेचा संदेश देणारा ठरला.
