Spread the love

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; चार आरोपी अटकेत, चोरीचे चार गुन्हे उघडकीस, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

धुळे (सुनील निकम) : अंगणात झोपलेल्या वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून पसार होणाऱ्या चार जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकलींसह चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे मंगळसूत्र चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 31 मे 2026 रोजी शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील रहिवासी सतीश सुभाष पाटील यांच्या आई अंगणात खाटेवर झोपलेल्या असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून मोटारसायकलवरून पलायन केले होते. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली की, सरवड फाटा परिसरात काही संशयित युवक दोन मोटारसायकलींसह थांबले असून त्यांचा मंगळसूत्र चोरीच्या घटनांशी संबंध आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक रवाना करण्यात आले.

पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील सरवड फाटा परिसरात सापळा रचून वैभव चतुर बोरसे (वय 21, रा. नगाव), मुस्तफा जुमा पिंजारी (वय 20, रा. नगाव), धिरज बालूसिंग गिरासे (वय 20, रा. खलाणे, ता. शिंदखेडा) आणि भुषण रमेश पाटील (रा. नवे कोडदे, ता. शिंदखेडा) या चौघांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपींनी अमराळे आणि होळ (ता. शिंदखेडा) परिसरात घडलेल्या मंगळसूत्र चोरीच्या तीन घटनांची कबुली दिली. तसेच अधिक तपासात आरोपींनी नवलनगर, धुळे येथून एक मोटारसायकल चोरी केल्याचीही कबुली दिली. चोरीची मोटारसायकल त्यांनी गोंदूर रोड परिसरात लपवून ठेवली होती. तीही पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाईमुळे शिंदखेडा तालुक्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटनांचा उलगडा झाला असून नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी झाली आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version