मुलाला विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याची सल कायम; जाहीर कार्यक्रमातून भावनांना दिली वाट
गुलाबराव पाटील यांची पुन्हा खदखद, शायरीतून व्यक्त केली नाराजी
जळगाव : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे. आपल्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करूनही यश न आल्याने मनात साचलेली खदखद त्यांनी जाहीर कार्यक्रमातून शायरीच्या माध्यमातून व्यक्त केली.
“नसीब में होगा तो उचलकर आयेगा और नसीब में नही होगा तो आकर चला जायेगा,” या ओळींमधून गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा एकदा उधाण आणले आहे. विधान परिषद निवडणुकीची जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेल्याने शिवसेना शिंदे गटाची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आपल्या चिरंजीव प्रतापराव पाटील यांना आमदार करण्याचे स्वप्न सध्या तरी अपूर्ण राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
जाहीर कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, अनेक जण मला विधान परिषद उमेदवारीबाबत प्रश्न विचारतात. मात्र, आयुष्यात जे नशिबात असेल ते मिळतेच. आणि जे नशिबात नसेल ते समोर येऊनही निघून जाते. त्यामुळे प्रारब्धावर आणि देवाच्या इच्छेवर विश्वास ठेवला पाहिजे. कदाचित देवाच्या मनात यापेक्षाही मोठे आणि चांगले काहीतरी असेल, असे सूचक विधान त्यांनी केले.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना राजकारण करताना विचारधारा विसरू नये, असा सल्लाही दिला. “राजकारण करा, पण भगव्या विचारांचा प्रकाश कधीही सोडू नका. जनतेने मला आमदार केले, मंत्री केले म्हणूनच आज मी सामाजिक कार्य करू शकतो आणि लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी गुलाबराव पाटील यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू ठेवले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत त्यांनी मुंबईत मुक्काम ठोकला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीन ते चार वेळा भेट घेऊन त्यांनी आपल्या मुलासाठी उमेदवारीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, महायुतीच्या जागावाटपात भाजपने ही जागा सोडण्यास नकार दिल्याने त्यांच्या पदरी निराशा आली.
याचा परिणाम जळगावमधील राजकीय घडामोडींवरही दिसून आला. भाजप उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल करताना गुलाबराव पाटील अनुपस्थित राहिले. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही अर्ज भरण्याच्या कार्यक्रमापासून दूर राहिल्याने नाराजीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले. महायुतीतील ही नाराजी निवडणुकीत कितपत परिणामकारक ठरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून जळगावच्या विधान परिषद निवडणुकीत पुढील काही दिवसांत आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
