‘खानदेशातील निवडक आधुनिक कवींच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास’ ग्रंथाचे प्रकाशन; आधुनिक साहित्यप्रवाहाचा सखोल वेध
धरणगाव (वाल्मिक पाटील) : धरणगाव येथील रहिवासी तथा एरंडोल येथील रा.ति. काबरे विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक संतोष धनगर यांचे कनिष्ठ सुपुत्र आणि प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. ज्ञानसागर सूर्यवंशी यांच्या ‘खानदेशातील निवडक आधुनिक कवींच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास’ या संशोधनग्रंथाचे नुकतेच प्रकाशन झाले असून साहित्य, संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रात त्याची विशेष दखल घेतली जात आहे.
जळगाव येथील अकॅडमी बुक हाऊस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या ग्रंथामध्ये खानदेशातील आधुनिक साहित्यप्रवाह समृद्ध करणाऱ्या सहा निवडक कवींच्या कवितांचा सखोल आणि चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. आधुनिक कवितेतील सामाजिक भान, परिवर्तनवादी विचार, प्रबोधनात्मक मूल्ये आणि समकालीन वास्तवाचे विविध पैलू संशोधनात्मक पद्धतीने उलगडण्याचा प्रयत्न या ग्रंथातून करण्यात आला आहे.
या ग्रंथात कवी अशोक सोनवणे, डॉ. संजीवकुमार सोनवणे, प्रा. बी. एन. चौधरी, प्रा. वा. ना. आंधळे, पांडुरंग सुतार तसेच कवयित्री माया धुप्पड यांच्या कवितांचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. साहित्याच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची प्रेरणा देणाऱ्या विचारधारेचे अभ्यासपूर्ण विवेचन हे या ग्रंथाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जात आहे.
संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य
डॉ. ज्ञानसागर सूर्यवंशी हे सध्या अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनासोबतच त्यांनी संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या आतापर्यंत दहा संशोधनपर शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत.
त्यांच्या या यशस्वी संशोधन कार्याबद्दल धनगर प्राध्यापक महासंघ, जळगाव जिल्हा मल्हार सेना, कर्तव्य बहुउद्देशीय संस्था तसेच नगरसेवक सुनील चौधरी यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान
या संशोधन कार्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील मराठी विभागाचे विभागप्रमुख डॉ. रमेश जाधव यांच्यासह प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, प्रा. डॉ. दासू वैद्य, प्रा. डॉ. कैलास अंभुरे, प्रा. डॉ. गजाननराव सानप, एम.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव वले, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रा. डॉ. म. सु. पगारे, तसेच प्रताप महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी, डॉ. प्रमोद गुलगुले आणि कल्पिताताई पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
मराठी साहित्य संशोधनासाठी मोलाची भर
खानदेशातील आधुनिक कवितेचा चिकित्सक, वस्तुनिष्ठ आणि संशोधनात्मक दृष्टीकोनातून घेतलेला हा अभ्यास मराठी साहित्य संशोधन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना साहित्यप्रेमी, अभ्यासक आणि संशोधकांकडून व्यक्त होत आहे. भविष्यातही दर्जेदार संशोधनपर ग्रंथ लेखन करून मराठी साहित्य समृद्ध करण्याचा मानस डॉ. ज्ञानसागर सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.
