Spread the love

एससी प्रवर्गातील ५९ जातींच्या समाजबांधवांचा सहभाग अपेक्षित; प्रशासनाकडे परवानगी व सुविधांची मागणी

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात समाज संघटित • ११ जुलै रोजी महाराणा प्रताप चौकात परिषद • राज्यभरातून हजारो समाजबांधव उपस्थित राहणार • प्रशासनाकडे जागा, मंडप व परवानगीची मागणी

धुळे (सुनील निकम ) : महाराष्ट्र शासनाकडून सुरू असलेल्या अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरण प्रक्रियेविरोधात अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध समाजघटकांनी एल्गार पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या नागरिकांची ‘एकता परिषद’ येत्या ११ जुलै रोजी धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी आवश्यक जागा, मंडप व प्रशासकीय परवानग्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आयोजकांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध जातींच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जाती समाजामध्ये गंभीर चिंता, अस्वस्थता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजाच्या एकात्मतेवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

परिषदेच्या आयोजकांचे म्हणणे आहे की, उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमुळे अनुसूचित जाती समाजात विभागणी निर्माण होण्याची शक्यता असून, सामाजिक ऐक्याला धक्का बसू शकतो. त्यामुळे समाजाची एकजूट कायम राखण्यासाठी आणि शासनाच्या प्रस्तावित प्रक्रियेविरोधात लोकशाही मार्गाने भूमिका मांडण्यासाठी या एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा वापर करत शांततापूर्ण मार्गाने समाजाच्या भावना आणि भूमिका शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या परिषदेतून केला जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. तसेच अनुसूचित जाती समाजातील विविध घटकांमध्ये संवाद वाढवून सामाजिक ऐक्य अधिक मजबूत करण्यावर परिषदेत भर दिला जाणार आहे.

परिषदेसाठी धुळे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून हजारो समाजबांधव उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी व्यापक जनजागृती मोहीमही राबविण्यात येत असून विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.

यावेळी एकता परिषदेचे आनंद लोंढे, ॲड. संतोष जाधव, रवींद्र पवार, जितेंद्र जगताप, वाल्मीक जगताप, दादा पहाडी, कन्हैया साखरे, मनीष चांगरे, सुरेश बैसाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी परिषदेत अनुसूचित जाती समाजाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार असून, समाजातील एकात्मता टिकविण्यासाठी सामूहिक भूमिका जाहीर केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version