सोनगीर पोलिसांच्या मदतीने ट्रक पकडला; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई
धुळे : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने धुळे जिल्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल 18 लाख 50 हजार रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली असून अवैध व्यापार करणाऱ्यांना मोठा इशारा मिळाला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहआयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) जी. व्ही. माहोरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सोनगीर पोलीस ठाण्याचे सहकार्य लाभले.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एचआर-55 एई-6821 क्रमांकाच्या वाहनातून महाराष्ट्रात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक केली जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सापळा रचून संबंधित वाहनाची तपासणी केली.
तपासणीदरम्यान वाहनामध्ये विमल पान मसाला, व्ही-1 तंबाखू तसेच इतर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा मोठा साठा आढळून आला. पथकाने तात्काळ कारवाई करत संपूर्ण माल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची एकूण किंमत 18 लाख 50 हजार रुपये असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी वाहन चालक सुरेशकुमार बिरबलराम गुवरिया (रा. राजस्थान) याच्याविरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात एफआयआर क्रमांक 206/2026 नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक, साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
अन्न व औषध प्रशासनाने सांगितले की, राज्यात गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी असून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाविरोधात विशेष मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. भविष्यातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशाराही विभागाने दिला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी ए. बी. पवार, एस. बी. राणे तसेच सहाय्यक आयुक्त जी. व्ही. माहोरे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
► धुळ्यात 18.50 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
► सोनगीर पोलिसांच्या मदतीने ट्रक पकडला
► विमल पान मसाला, व्ही-1 तंबाखूसह मोठा साठा जप्त
► राजस्थानच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
► तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
► प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात मोहीम अधिक तीव्र
