Spread the love

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची भक्तिमय सांगता; हजारो भाविकांची उपस्थिती, महाप्रसादाचा लाभ

पाळधीत चौथ्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न • ७० ते ८० नामवंत कीर्तनकार-प्रवचनकारांची उपस्थिती • जीपीएस मित्र परिवाराचे शिस्तबद्ध नियोजन ठरले आकर्षण • हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

पाळधी/धरणगाव  : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त पाळधी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या चौथ्या वर्षाची गुरुवारी भक्ती, सेवा, संस्कार आणि सामाजिक एकोप्याच्या वातावरणात दिमाखदार सांगता झाली. हजारो वारकरी, संत-महंत, कीर्तनकार आणि भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण पाळधी गावाला अक्षरशः पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते.

सप्ताहाचा समारोप ह.भ.प. गौप्रेमी गजानन महाराज वरसाडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. टाळ-मृदुंगाचा निनाद, विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषाने भारलेले वातावरण, हरिनामात तल्लीन झालेले वारकरी आणि संतविचारांनी भारलेली प्रवचने यामुळे संपूर्ण पंचक्रोशी भक्तिरसात न्हाऊन निघाली. गावातील प्रत्येक रस्ता, चौक आणि सप्ताह परिसरातून अखंड हरिनामाचा गजर घुमत होता.

“जनतेच्या आशीर्वादामुळेच जनसेवेची संधी” – गुलाबराव पाटील
समारोपप्रसंगी उपस्थित भाविकांना संबोधित करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळेच आम्हाला जनसेवेची संधी मिळाली आहे. माझ्या अभिष्टचिंतनानिमित्त आयोजित या हरिनाम सप्ताहाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मन भारावून गेले आहे. समाजात अध्यात्म, सेवा, संस्कार आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत करणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

जीपीएस मित्र परिवाराचा वारकरी साज ठरला आकर्षण
या सप्ताहाचे विशेष आकर्षण ठरले ते जीपीएस मित्र परिवाराचे शिस्तबद्ध आणि संस्कारमय नियोजन. युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

जीपीएस मित्र परिवारातील १५० हून अधिक युवकांनी धोतर-कुर्ता हा पारंपरिक ड्रेस कोड स्वीकारला होता. तर सौ. ममता पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जीपीएस मैत्रिणी ग्रुपमधील सुमारे १०० महिलांनी एकसमान पारंपरिक साडी परिधान केली होती. या पारंपरिक वेशभूषेमुळे संपूर्ण परिसरात वारकरी संप्रदायाचे जिवंत चित्र अनुभवायला मिळाले.

७० ते ८० नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती
सप्ताहात महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या तब्बल ७० ते ८० नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, भजनकार आणि हरिभक्त पारायण मंडळी सहभागी झाली होती. संतवाङ्मय, अभंग, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि प्रवचनांमधून भक्तीचा अखंड प्रवाह वाहत राहिला.

“प्रेमाने देवही जिंकता येतो” – गजानन महाराजांचे निरूपण
काल्याच्या कीर्तनात ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर यांनी प्रेम, भक्ती, संस्कार आणि नामस्मरणाचे महत्त्व अत्यंत प्रभावी शब्दांत विशद केले. “कृष्णाचे जीवन उच्चारणी आहे आणि रामाचे जीवन आचरणी आहे. आदर्श संसारासाठी रामायण आणि जीवन उद्धारासाठी श्रीकृष्ण चरित्र आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

प्रेमाच्या शक्तीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले, “प्रेम ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे. प्रेमाने जग जिंकता येते. परमात्म्यावर केलेले प्रेम कधीही वाया जात नाही, ते माणसाला तारून नेते.”

गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा गौरव
कीर्तनादरम्यान गजानन महाराजांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समाजसेवा, संतसेवा आणि जनहिताच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. जळगावमध्ये उभारण्यात आलेले वारकरी भवन, गरजूंसाठी आयोजित डोळ्यांच्या शस्त्रक्रिया शिबिरे आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. “सत्ता ही केवळ पदासाठी नसते, तर समाजसेवेसाठी असते. गुलाबराव पाटील हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
सप्ताहाच्या सांगतेनंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. जीपीएस मित्र परिवार आणि जीपीएस मैत्रिणी ग्रुपच्या सदस्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि सेवाभावी पद्धतीने महाप्रसाद वितरणाची व्यवस्था सांभाळली. दिवसभर सुरू असलेल्या महाप्रसाद वितरणामुळे संपूर्ण परिसरात समाधान, आनंद आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

भक्ती, सेवा, संस्कार आणि सामाजिक एकोप्याचा अद्वितीय संगम घडवून आणणारा हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह पाळधीच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणारा सोहळा ठरला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version