Spread the love

व्हॉट्सॲप स्टेटसवरून वाद चिघळला; जुन्या वैमनस्यातून दोन राऊंड फायरिंगचा आरोप

कल्याण : कल्याणजवळील मोहने-अटाळी परिसरातील पाटील नगर येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक उर्फ ‘अभी’ पवार आणि त्याचे काही साथीदार पाटील नगर परिसरातून जात असताना त्यांची मोनू फुलोरे यांच्याशी जुन्या वादाच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली. हा वाद काही क्षणांतच उग्र रूप धारण करत मोनू फुलोरे यांच्या दिशेने दोन राऊंड गोळीबार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर घाबरलेल्या मोनू फुलोरे यांनी तातडीने खडकपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या जबाबानुसार, अभिषेक पवार याने स्वतःवर गुन्हा दाखल होऊ नये किंवा दिशाभूल करण्याच्या उद्देशाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याची सत्यता पोलिसांकडून तपासली जात असून त्याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.

प्राथमिक तपासात व्हॉट्सॲप स्टेटसवरून सुरू झालेला वाद आणि त्यात भर घालणारे जुने मतभेद हे या घटनेमागील प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. गोळीबारानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आंधळे पुढील तपास करत आहेत. गोळीबारामागील नेमके कारण, वापरण्यात आलेले शस्त्र आणि इतर संबंधित बाबींचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे मोहने-अटाळी परिसरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version