Spread the love

युवासेना जिल्हाध्यक्ष योगेश मराठे यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आकर्षक फ्रेम भेट; संघटनात्मक कार्याचे खासदारांकडून कौतुक

धुळे (सुनील निकम) : शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘शिव संवाद यात्रा’निमित्त धुळे दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे शहरात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शिवसेना जिल्हाध्यक्ष मनोज मोरे आणि युवासेना धुळे जिल्हाध्यक्ष योगेश मराठे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित स्वागत सोहळ्यात युवासैनिकांनी मोठ्या जल्लोषात सहभाग घेतला.

स्वागत समारंभादरम्यान युवासेना जिल्हाध्यक्ष योगेश मराठे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आकर्षक फ्रेम भेट म्हणून प्रदान केली. या अनोख्या भेटीबद्दल समाधान व्यक्त करत खासदारांनी योगेश मराठे यांच्या कल्पकतेचे आणि जिव्हाळ्याच्या भावनेचे विशेष कौतुक केले.

यावेळी धुळे जिल्ह्यातील युवासेनेच्या संघटनात्मक कार्याचा आणि कार्यकर्त्यांच्या शिस्तबद्ध सहभागाचाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गौरव केला. ‘युवासेना धुळे’ या संघटनेने जिल्ह्यात उभारलेले काम आणि युवकांचा उत्साह प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि युवासैनिकांचे तोंडभरून अभिनंदन केले.

धुळे जिल्ह्यात युवासेना ज्या ताकदीने आणि समर्पित भावनेने कार्यरत आहे, ते पक्षाच्या बळकटीसाठी महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यांच्या या गौरवोद्गारांमुळे उपस्थित युवासैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या स्वागत सोहळ्यास युवासेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. ‘शिव संवाद यात्रा’च्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमामुळे धुळे जिल्ह्यातील शिवसेना आणि युवासेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी संघटनात्मक उपक्रमांसाठी नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version