Spread the love

बहुजन समाजाने अंधश्रद्धा आणि कर्मकांडापासून मुक्त व्हावे; सत्यशोधक विचारांची आज काळाला गरज – पी. डी. पाटील

धरणगाव : धरणगाव तालुक्यातील अनोरे गावात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम पार पडला. निसर्गवासी लाडकाबाई तुकाराम महाजन यांच्या उत्तरकार्याचा विधी पारंपरिक कर्मकांडांना फाटा देत सत्यशोधक पद्धतीने करण्यात आला. या उपक्रमामुळे गावात सामाजिक प्रबोधनाचा संदेश पोहोचला असून उपस्थितांनी त्याचे स्वागत केले.

अनोरे येथील तुकाराम सुकदेव महाजन यांच्या पत्नी तसेच माळी समाजाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रमेश महाजन आणि हरी महाजन यांच्या मातोश्री निसर्गवासी लाडकाबाई तुकाराम महाजन यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात संत, महापुरुष आणि महामाता यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सत्यशोधक समाजाची प्रार्थना आणि विधी सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

यावेळी बोलताना सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी समाजाने अंधश्रद्धा, अवास्तव कर्मकांड आणि शोषणकारी प्रथांपासून मुक्त होण्याची गरज व्यक्त केली. सत्यशोधक विचारांच्या माध्यमातून समताधिष्ठित आणि शोषणमुक्त समाज निर्माण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजपरिवर्तनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात माजी मुख्याध्यापक एम. एच. चौधरी आणि माजी सरपंच भगवान महाजन यांनी मनोगत व्यक्त करत निसर्गवासी लाडकाबाई महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सत्यशोधक विधीची प्रेरणा सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार आणि सचिव डॉ. सुरेश झाल्टे यांच्या मार्गदर्शनातून मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी उपस्थित सर्व नातेवाईक आणि मान्यवरांना महापुरुषांच्या विचारांवरील ग्रंथ तसेच सत्यशोधक समाजाची दिनदर्शिका भेट देण्यात आली. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी भामरे परिवाराच्या वतीने शेत परिसरात लिंब, पिंपळ आणि वड या वृक्षांची लागवड करण्यात आली.

या कार्यक्रमास आरटीआयचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र वाघ, सरपंच स्वप्निल महाजन, पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव पाटील, मधुकर देशमुख, रमेश गुरुजी, लक्ष्मण महाजन, पत्रकार कल्पेश महाजन, जितेंद्र महाजन, मनोहर महाजन, भगवान महाजन, दगा महाजन यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा, पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनोरे गावात प्रथमच झालेल्या या सत्यशोधक विधीमुळे समाजात विचारप्रबोधनाचा संदेश गेला असून, अंधश्रद्धामुक्त आणि समतावादी समाजनिर्मितीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version