ॲड. धनंजय बुद्धिवंत यांच्या हस्ते उपक्रम; ‘निसर्ग संवर्धनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज’
पुणे (शंकर जोग) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) – इंटकच्या वतीने पिसोळी येथील नानासाहेब बुद्धिवंत नगर परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी इंटकचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. धनंजय बुद्धिवंत यांच्या हस्ते सुमारे २५० विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसर अधिक हिरवागार करण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाला पुणे शहराध्यक्ष इमरान शेख, पुणे शहर महिला कार्याध्यक्ष अलिशा बुद्धिवंत, पुणे शहर महिला अध्यक्षा मुमताज शेख, पुणे जिल्हा महिला सचिव मेघा शेगर, रमेश तिवारी, हुजेर शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ॲड. धनंजय बुद्धिवंत म्हणाले की, “निसर्गाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून काळाची गरज बनली आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला पाहिजे.” या वृक्षारोपण मोहिमेद्वारे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याबरोबरच भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
