Spread the love

पाणीटंचाई, अस्वच्छता आणि विकासकामे रखडल्याने ग्रामस्थ संतप्त; अतिरिक्त ग्रामसेवक लक्ष देत नसल्याचा आरोप, प्रशासनाचे मात्र नियुक्ती झाल्याचा दावा

एरंडोल (रतन अडकमोल) : रिंगणगाव ग्रामपंचायतीची मुदत संपून जवळपास चार ते पाच महिने उलटून गेल्यानंतरही गावातील प्रशासनिक व्यवस्थेबाबत संभ्रमाचे वातावरण कायम असून, प्रशासक नियुक्ती आणि ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीवरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गावातील मूलभूत सुविधा विस्कळीत झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर अद्याप प्रभावी प्रशासन उभे राहिलेले नाही. अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे ग्रामसेवक नियमितपणे गावाकडे लक्ष देत नसल्याने अनेक नागरी प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे एरंडोल पंचायत समितीच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सध्या गावात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याशिवाय गावातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळा तोंडावर असतानाही स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामपंचायतीचा कारभार प्रभावीपणे सुरू नसल्यामुळे विकासकामेही रखडली असून, “गावातील समस्या सोडवणार तरी कोण?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे गावात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर अत्यावश्यक सेवांचा कारभार सुरळीत चालावा यासाठी तत्कालीन सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून पुढे आली आहे.

स्वतःच्या खर्चातून पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न : भानुदास मते
यासंदर्भात तत्कालीन सरपंच भानुदास मते यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीची मुदत संपून चार ते पाच महिने झाले आहेत. मात्र अद्याप प्रशासक नियुक्तीबाबत कोणतेही अधिकृत पत्र मिळालेले नाही. अतिरिक्त ग्रामसेवकाकडूनही अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याने गावात स्वच्छता आणि पाणीटंचाईच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मी स्वतःच्या खर्चातून गावातील पाणीगळती (लिकेज) दुरुस्त करण्याचे काम करत आहे.”

प्रशासक नियुक्त असल्याचा प्रशासनाचा दावा
दुसरीकडे, एरंडोल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रतिभा सुर्वे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “रिंगणगाव ग्रामपंचायतीसाठी अतिरिक्त ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आलेली असून त्या ठिकाणी प्रशासकही नियुक्त करण्यात आला आहे.”

ग्रामस्थांचा दावा आणि प्रशासनाची भूमिका यामध्ये स्पष्ट विसंगती दिसून येत असल्याने नेमकी वस्तुस्थिती काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट माहिती देऊन गावातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version