मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक उत्साहात, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे तातडीच्या पंचनाम्यांचे निर्देश; नुकसानभरपाई प्रक्रिया गतीमान करण्यावर भर
मुंबई/पाळधी/जळगाव : मे आणि जून २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय (दत्ता मामा) भरणे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारामुळे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी महत्त्वपूर्ण निर्णयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्या ठामपणे मांडल्या. यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वादळी वाऱ्यामुळे बाधित झालेल्या फळपिकांचे पंचनामे तातडीने आणि काटेकोरपणे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्याबरोबरच नुकसानभरपाईची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी महसूल विभाग, कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यात २३ मे ते ६ जून २०२६ या कालावधीत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ४१३ गावांतील तब्बल १० हजार ३६९ शेतकरी बाधित झाले असून सुमारे ७ हजार २१६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये रावेर तालुक्यातील सुमारे ३ हजार ७७१ हेक्टर, मुक्ताईनगर तालुक्यातील १ हजार ५४९ हेक्टर आणि चोपडा तालुक्यातील ८८५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. विशेषतः रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील केळी बागांना सर्वाधिक फटका बसल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. विमा कंपन्यांकडून कमी क्षेत्र दाखविण्याच्या तक्रारी, पूर्वसूचना नोंदणीतील तांत्रिक अडचणी, एमआरएसएसी अहवालामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव आणि केळी उत्पादकांना विशेष आर्थिक मदत देण्याची गरज त्यांनी बैठकीत मांडली. मध्यप्रदेश शासनाच्या धर्तीवर नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना हेक्टरी दोन लाख रुपयांची विशेष मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.
या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच विमा कंपन्यांनी प्रत्यक्ष पंचनामे आणि वस्तुस्थितीच्या आधारे दावे निकाली काढावेत, अपील केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करावी आणि नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण पुढील दहा दिवसांत पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश दिले.
या बैठकीला फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदविला. तसेच कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव परिमल सिंग, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, कृषी संचालक (विस्तार) रफिक नाईकवाडी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, भारतीय कृषी विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, विविध विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या समारोपावेळी कृषिमंत्री भरणे यांनी “शेतकरी हा शासनाच्या कामकाजाचा केंद्रबिंदू असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत न्याय आणि आर्थिक मदत मिळणे ही सर्व यंत्रणांची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट करत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्याच्या प्रश्नांना राज्य शासनाच्या सर्वोच्च स्तरावर प्राधान्य मिळाल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
