Spread the love

बेटावद मध्ये विवाहित महिलेची आत्महत्या की हत्या? कुटुंबीयांना अश्रू अनावर, पोलिसांचा तपास सुरू……

नरडाणा धुळे (सुनील निकम) :  मुलगा बहिणीला देण्यासाठी झालेल्या वादातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचा गंभीर आरोप पीडीत कुटुंबीयांनी केला आहे. नरडाण्यातील बेटावद येथे झालेल्या घटनेमुळे विवाहितेची आत्महत्या आहे की हत्या? याबाबतचा तपास नरडाणा पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र तत्पूर्वी याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर विवाहितेची आत्महत्या की हत्या? हे स्पष्ट होणार आहे. मात्र शव विच्छेदन अहवाल येण्यापूर्वीच खाटीक कुटुंबियांनी पती नासिर खाटीक यानेच त्याच्या पत्नीची राहत्या घरात हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे खाटीक याला तात्काळ अटक करून हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पीडित कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांकडे केली आहे. यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.

बेटावद येथील फिरोज नूरमोहम्मद खाटीक यांची भाची असणाऱ्या 25 वर्षीय तमन्ना खाटीक हिचा जळगावच्या निंभोरा खिंडली येथील नासिर खाटीक याच्याशी 2024 मध्ये विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर दोन महिन्यातच दोघेही पती-पत्नी बेटावद येथील मामाच्या गावाला राहायला आले होते. पुढे तमन्नाला मुलगा झाला होता. झालेला मुलगा बहिणीला द्यावा यासाठी दोघा पती-पत्नींमध्ये अनेक वेळा वाद देखील झाले होते. बहिणीला मुलगा नसल्याने नासिर खाटीक याने पत्नीकडे स्वतःचा मुलगा बहिणीला देण्यासाठी वारंवार तगादा लावत असल्याचा आरोप तमन्नाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

याच वादातून दोघा पती-पत्नीमध्ये 26 मे रोजी रात्रीच्या सुमारास वाद झाला. झालेल्या वादानंतर पतीनेच पत्नीची हत्या केल्याचा गंभीर आरोप खाटीक कुटुंबीयांनी केला आहे. पंचवीस वर्षीय तमन्नाच्या गळ्यावर दोरीचे निशाण असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. पत्नीने आत्महत्या केल्याचं सांगत पतीच्या माहितीनुसार नरडाणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र कुटुंबीयांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पंचवीस वर्षीय विवाहितेची आत्महत्या की हत्या? हे स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नरडाणा पोलीस करत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version