Spread the love

घरबांधणीतील कथित फसवणुकीप्रकरणी जवानांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव; कंत्राटदार आणि अभियंत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

धुळे(सुनील निकम) : देशाच्या सीमेवर जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या जवानांना स्वतःच्या घराच्या बांधकामातील कथित फसवणुकीमुळे न्यायासाठी पोलीस ठाणे आणि शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची धक्कादायक बाब धुळ्यात समोर आली आहे. घरबांधणीमध्ये झालेल्या कथित फसवणुकीप्रकरणी संबंधित खाजगी कंत्राटदार आणि अभियंत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त जवानांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत न्यायाची मागणी केली.

जवान विनोद बोरसे, कृष्णा शिंदे, योगेश कोळपे यांच्यासह इतरांनी सुमारे सात महिन्यांपूर्वी फागणे येथील खाजगी कंत्राटदार महेंद्र पाटील आणि अभियंता युवराज सूर्यवंशी यांच्याकडे घरबांधणीचे काम सोपवले होते. मात्र, अवघ्या सहा ते सात महिन्यांतच बांधलेल्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचा आरोप संबंधित जवानांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या स्वप्नातील घरांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या संदर्भात संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्याशी अनेकदा संपर्क साधून दुरुस्तीची मागणी करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर जवानांनी न्यायासाठी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. सुरुवातीला आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी टाळाटाळ करत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाण्याचा सल्ला दिल्याचा आरोपही जवानांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या जवानांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यावर भारतीय न्याय संहितेअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. “आम्ही देशसेवा करायची की न्यायासाठी कोर्टात लढायचं?” असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

देशरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या जवानांना न्यायासाठी रजा घेऊन लढा उभारावा लागत असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा पोलीस प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार का, तसेच फसवणुकीचा आरोप करणाऱ्या जवानांना न्याय मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी विनोद बोरसे, कृष्णा शिंदे, विकास लवटे, प्रदीप थोरात, राहुल थोरात, योगेश कोळपे यांच्यासह अनेक जवान उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version