इयत्ता सातवीच्या सानवी पंकज गडेच्या यशाबद्दल शाळा, पालक आणि यावलकरांकडून कौतुकाचा वर्षाव
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत जळगाव जिल्ह्याचा मान उंचावला
यावल (सुपडू संदानशिव) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित सन २०२५-२६ च्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बाल संस्कार विद्या मंदिर, यावल येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. सानवी पंकज गडे हिने तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीमुळे शाळेसह यावल शहर आणि जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्य, प्रभावी मांडणी, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर सानवीने राज्यस्तरावर आपली वेगळी छाप पाडली. स्पर्धेतील तिच्या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून ती अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
सानवी ही प्रा. पंकज गडे यांची कन्या असून शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही ती सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. राज्यस्तरीय यशानंतर बाल संस्कार विद्या मंदिर परिवारात आनंदाचे वातावरण असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी, मुख्याध्यापक सुनील माळी, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच नातेवाईक आणि यावल शहरातील विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी सानवीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता वक्तृत्व, कला, संस्कृती आणि विविध स्पर्धात्मक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, याचे उत्तम उदाहरण सानवीच्या यशातून समोर आले आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही राज्यस्तरावर झेप घेण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
सानवी गडे हिच्या पुढील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक वाटचालीस विविध स्तरांतून हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून भविष्यातही ती अशीच उल्लेखनीय कामगिरी करून यावल आणि जळगाव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
