फिरते नेत्रालय’ ठरणार मुख्य आकर्षण, जीपीएस मित्र परिवार व आर. आर. झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम
आतापर्यंत १५ हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया
नशिराबाद (धीरज सैतवाल) : ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या आजारांवर आधुनिक आणि दर्जेदार उपचार सहज उपलब्ध व्हावेत या उद्देशाने जीपीएस मित्र परिवार (गुलाबराव पाटील स्कूल मित्र परिवार) आणि आर. आर. झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, १५ जून २०२६ रोजी नशिराबाद येथे भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया निवड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिवसेना कार्यालय, श्री विठ्ठल मंदिरासमोर, खालची आळी, नशिराबाद येथे पार पडणार असून परिसरातील गरजू नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कॅबिनेट मंत्री ना. गुलाबराव पाटील आणि युवा नेते प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जीपीएस मित्र परिवारामार्फत हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. या माध्यमातून आजपर्यंत मतदारसंघातील सुमारे १५ हजारांहून अधिक रुग्णांवर पनवेल येथील झुंझुनवाला हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे रुग्णांच्या येण्या-जाण्याचा प्रवास, निवास व्यवस्था तसेच शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने उचलला जातो.
यंदाच्या शिबिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेली ‘फिरते नेत्रालय’ (मोबाईल आय क्लिनिक) व्हॅन होय. ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेमुळे रुग्णांच्या डोळ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जागेवरच अचूक तपासणी केली जाणार आहे. शिबिरात नागरिकांना डोळ्यांची सखोल तपासणी, मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे मोफत ने-आण व्यवस्था, तसेच चष्म्याचा नंबर तपासून पात्र लाभार्थ्यांना जीपीएस मित्र परिवारातर्फे मोफत चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
नशिराबाद शहरासह बेळी, निमगाव, भादली, जळगाव खुर्द, तरसोद आणि मन्यारखेडे परिसरातील डोळ्यांच्या समस्यांनी त्रस्त असलेले नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरासाठी नावनोंदणी सुरू असून इच्छुकांनी ७५१७५ ०९०९० किंवा ९८९०५ ९८१९९ या क्रमांकांवर संपर्क साधून आपली नोंदणी करावी.
तसेच आज शनिवार आणि उद्या रविवार हे दोन दिवस उपलब्ध असल्याने सर्व मित्रपरिवार, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील गरजू रुग्णांपर्यंत ही माहिती पोहोचवून त्यांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे शिबिर डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
