Spread the love

साक्री पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गुप्त माहितीच्या आधारे आरोपी जेरबंद

धुळे : जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत साक्री पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवत चार जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीच्या ताब्यातून तब्बल १८ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून मोटारसायकल चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईमुळे वाहनचोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

धुळे जिल्ह्यातून चोरी होणाऱ्या मोटारसायकली आणि त्यामागील चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार साक्री पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १६८/२०२६ अंतर्गत मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे दि. १२ जून २०२६ रोजी साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने निलेश रमेश खैरनार (वय ३२, रा. म्हसदी, ता. साक्री) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांसह परिसरातून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.

या प्रकरणात त्याचे फरार साथीदार दिशांत रामदास अहिरे (वय २६), एक विधिसंघर्षग्रस्त बालक आणि विशाल राजेंद्र अहिरे (वय २४), सर्व रा. जायखेडा, ता. सटाणा, जि. नाशिक यांनी संगनमत करून साक्री व परिसरातून विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याचे समोर आले.

आरोपींच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी त्यांनी लपवून ठेवलेल्या एकूण १८ मोटारसायकली जप्त केल्या. या वाहनांच्या आधारे मोटारसायकल चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आले असून इतर गुन्ह्यांबाबतही तपास सुरू आहे. या टोळीने आणखी कुठे आणि किती चोरीच्या घटना घडवल्या आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल, विकास शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ, राजू जाधव तसेच पोलीस अंमलदार बापू रायते, संदीप सावळे, मयूर चौधरी, नारायण चव्हाण, साईनाथ पवार, सुशीलकुमार सूर्यवंशी आणि अमोल पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

साक्री पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाहनचोरीच्या घटनांवर अंकुश बसण्यास मदत होणार असून नागरिकांनीही आपल्या वाहनांच्या सुरक्षेबाबत अधिक दक्ष राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version